नवी दिल्ली,
Jadeja in the race for captaincy इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्समध्ये मोठी देवाणघेवाण झाली आहे. सीएसकेचा स्टार आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा आता राजस्थान रॉयल्समध्ये खेळणार आहे, तर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला आहे. या बदलांनंतर दोन्ही खेळाडू आपल्या नवीन फ्रँचायझींसाठी आयपीएल २०२६ मध्ये खेळतील.
रवींद्र जडेजा यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. तो २००८ मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकणाऱ्या आरआर संघाचा भाग होता. जड्डू पहिल्या दोन आयपीएल हंगामात राजस्थानकडून खेळला होता आणि आता तो आरआरमध्ये परतत आहे. संजू सॅमसनच्या राजस्थान सोडल्याने संघाच्या कर्णधारपदासाठी प्रश्न निर्माण झाला आहे. राजस्थानकडे भरपूर पर्याय असून, फ्रँचायझी जर अनुभवी खेळाडूला कर्णधारपदासाठी नियुक्त करू इच्छित असेल, तर रवींद्र जडेजा हा योग्य उमेदवार ठरू शकतो. त्याला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे. तरुण खेळाडूंमध्ये यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांपैकी एकाचीही कर्णधारपदासाठी निवड होऊ शकते.
३७ वर्षीय रवींद्र जडेजाने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने २५४ सामने खेळले आहेत आणि १३०.३ च्या स्ट्राईक रेटने ३२६० धावा केल्या आहेत, त्यात पाच अर्धशतके देखील आहेत. त्याने आयपीएलमध्ये १७० विकेट्सही घेतल्या आहेत. जडेजाने चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्ससह कोची टस्कर्स केरळ आणि गुजरात लायन्सचेही प्रतिनिधित्व केले आहे.