पर्थ,
Major changes in the Australian team.अॅडलेड ओव्हलवर होणाऱ्या अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या अंतिम संघात महत्त्वाचे बदल केले आहेत. कर्णधार पॅट कमिन्स आणि अनुभवी फिरकीपटू नॅथन लिऑन यांचे संघात पुनरागमन झाले असून सलामीवीर उस्मान ख्वाजाला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. गॅब्बा येथे आठ विकेट्सने विजय मिळवणाऱ्या संघातून दोन खेळाडूंना वगळण्यात आले आहे. अष्टपैलू मायकेल नेसर आणि वेगवान गोलंदाज ब्रेंडन डॉजेट यांना या सामन्यासाठी संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे, नेसरने ब्रिस्बेन कसोटीत प्रभावी गोलंदाजी केली होती, तरीही त्याला बाहेर बसावे लागले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर पॅट कमिन्सची ही पहिलीच कसोटी ठरणार आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त असून या सामन्यात त्याच्यावर कोणतीही षटकांची मर्यादा नसेल, असे त्याने स्पष्ट केले. ब्रिस्बेन कसोटीत तो खेळला असता तर त्याला मर्यादित षटके टाकावी लागली असती, पण अॅडलेड कसोटीत तो पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करेल, असा विश्वास कमिन्सने व्यक्त केला. सलामीच्या बाबतीत निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा उस्मान ख्वाजावर विश्वास दाखवलेला नाही. ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदरल्ड यांना सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंग्लिस संघात कायम असून तो सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.
ख्वाजाबाबत बोलताना कमिन्सने सांगितले की त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपलेली नाही. तो संघासाठी नेहमीच उपलब्ध असणारा आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेला खेळाडू आहे. ब्यू वेबस्टर, मायकेल नेसर आणि ब्रेंडन डॉजेट यांसारख्या खेळाडूंना बाहेर बसावे लागले असले तरी संघातील वातावरण अतिशय सकारात्मक आहे, असेही कमिन्सने नमूद केले. पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटीत विजय मिळवत इंग्लंडवर वर्चस्व गाजवले आहे. तिसरी कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाला मालिका अजिंक्य आघाडी मिळणार आहे, तर इंग्लंडसाठी हा सामना ‘करा किंवा मरो’ ठरणार आहे.
अॅडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ असा आहे: ट्रॅव्हिस हेड, जेक वेदरल्ड, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश इंग्लिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लिऑन आणि स्कॉट बोलँड.