मोठा धक्का! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना २ वर्षांचा कारावास

16 Dec 2025 16:08:12
नाशिक,
Manikrao Kokate was punished नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का दिला आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवत जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा पुन्हा एकदा ठोठावली आहे. त्यामुळे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील सदनिकांचा बनावट कागदपत्रांच्या आधारे गैरवापर केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने दोषी ठरवले होते. या प्रकरणात प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देत कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत कोकाटे यांना दिलासा देण्यास नकार दिला.
 
 
 
Manikrao Kokate was punished
माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादांमुळे चर्चेत आहेत. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर कृषिमंत्रीपदाचा कार्यभार काढून घेऊन त्यांना क्रीडामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यातच सदनिका घोटाळा प्रकरणात न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्याने त्यांची राजकीय कोंडी अधिकच वाढली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, सुमारे ३० वर्षांपूर्वी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या सदनिका माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने यांनी मिळवल्या होत्या. या सदनिका मिळवताना बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप होता. तत्कालीन राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली होती. या चौकशीनंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर नाशिक न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोषी ठरवले. जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवल्याने आता माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0