१३ वर्षांपासून फरार नक्षलवादी वाराणसीत अटकेत

16 Dec 2025 09:53:53
वाराणसी,
Naxalite arrested in Varanasi उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठे यश मिळवत बंदी घातलेल्या सीपीआय संघटनेच्या एका वरिष्ठ नक्षलवाद्याला वाराणसीत अटक केली आहे. तब्बल १३ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीवर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सीताराम उर्फ विनय जी उर्फ ओमप्रकाश उर्फ धनू असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव असून तो बलिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. एटीएसने त्याला वाराणसीतील काशी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले.
 
 
Naxalite arrested in Varanasi.
 
एटीएसला बराच काळ गुप्त माहिती मिळत होती की सीपीआय संघटनेचा एक वरिष्ठ नेता वेगवेगळ्या राज्यांत लपून राहत असून सतत आपली ओळख आणि वेश बदलत आहे. या माहितीच्या आधारे एटीएसने सापळा रचत १५ डिसेंबर रोजी ही कारवाई केली. तपासात उघड झाले की सीतारामने १९८६ मध्ये घर सोडून माओवादी संघटनेत प्रवेश केला होता. पुढे १९९० मध्ये तो संघटनेच्या दुसऱ्या केंद्रीय समितीचा विभागीय सचिव बनला होता.
 
२००४ मध्ये एमसीसी आणि पीडब्ल्यूजी यांच्या विलीनीकरणातून स्थापन झालेल्या सीपीआय पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीतही तो सहभागी झाला होता. त्याच्यावर संघटनेचा जनआंदोलन विस्तारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. शहरी भागांतील स्थानिक कार्यकर्त्यांशीही त्याचे संपर्क असल्याचे तपासात समोर आले आहे. सीतारामवर अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. २०१२ मध्ये बलिया जिल्ह्यातील सहतवार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतरदरिया गावात ग्रामप्रधान मुसाफिर चौहान यांच्या पत्नी फुलमती यांच्या हत्येप्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. ग्रामप्रधान पोलीस माहिती देत असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्या अटकेसाठी बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
Powered By Sangraha 9.0