नवी दिल्ली,
Rain and snowfall warning उत्तर भारतात तीव्र थंडी सुरू आहे आणि देशभरातील अनेक भागात तापमान ५°-१०° सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १६ आणि १७ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीसह अनेक भागात दाट धुके राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ शकते. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातील काही डोंगराळ प्रदेशांमध्येही धुके राहण्याची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, आसाम, मेघालय, तेलंगणा, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्ये किमान तापमान ५°-१०° सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आले. भारतातील मैदानी भागात सर्वात कमी तापमान भटिंडा (पंजाब) येथे ४.८° सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याचे सांगणे आहे की, १६ ते १८ डिसेंबर दरम्यान हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, चंदीगड आणि दिल्लीमध्ये सकाळच्या वेळेत दाट धुके राहण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये काही भागात दाट धुके असून दिवसा पृष्ठभागावरील वाऱ्याचा वेग १५-२५ किमी प्रतितास राहील. दिल्लीतील कमाल तापमान २२-२४° सेल्सिअस आणि किमान तापमान ०९-११° सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशच्या उंच भागात हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडी अधिक वाढेल. हवामान खात्याने सांगितले की उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात २१ डिसेंबरपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. दक्षिण भारतातही हवामान बदल दिसून येत आहेत. १६ आणि १७ डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे तुरळक ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर १६-१८ डिसेंबर दरम्यान ३०-४० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात.