वैभव सूर्यवंशीची वादळी फलंदाजी; २०० च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक

16 Dec 2025 12:49:36
नवी दिल्ली,
Vaibhav Suryavanshi's explosive batting १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीने लक्ष वेधून घेतले आहे. जेव्हा जेव्हा तो मैदानात उतरतो, तेव्हा मोठ्या खेळीची अपेक्षा असते आणि मलेशियाविरुद्धच्या सामन्यात त्याने ती अपेक्षा पूर्ण केली. एसीसी अंडर-१९ आशिया कपच्या दहाव्या सामन्यात भारत आणि मलेशिया आमनेसामने आले असून, भारतीय संघाने आधीच सलग दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. आता विजयाची हॅटट्रिक साधण्याच्या उद्देशाने भारत मैदानात उतरला आहे.
 

vaibhav suryavanshi 
स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यूएईविरुद्ध भारताने २३४ धावांचा दणदणीत विजय मिळवला होता. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ९५ चेंडूत १७१ धावांची वादळी खेळी करत सामनावीराचा मान पटकावला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट शांत राहिली आणि तो केवळ ५ धावांवर बाद झाला. या अपयशानंतर मलेशियाविरुद्ध वैभवने दमदार पुनरागमन केले. भारतीय डावाची सुरुवात कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांनी केली. मात्र संघाची सुरुवात काहीशी अडखळणारी ठरली. अवघ्या २१ धावांत भारताने पहिल्या दोन विकेट्स गमावल्या. कर्णधार आयुष म्हात्रे दुसऱ्या षटकात १४ धावांवर बाद झाला, तर विहान मल्होत्रा पाचव्या षटकात केवळ ७ धावा करून तंबूत परतला. एका टोकाला विकेट्स पडत असतानाही वैभव सूर्यवंशीने संयम आणि आक्रमकता यांचा उत्तम समन्वय साधत भारतीय डाव सावरला.
 
 
वेदांत त्रिवेदीसोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची महत्त्वाची भागीदारी करत संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. वैभवने मलेशियन गोलंदाजांवर हल्ला चढवत अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक झळकावले. जवळपास २०० च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या डावात पाच चौकार आणि तीन उंच षटकारांचा समावेश होता. शतकाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असताना, मलेशियाचा गोलंदाज मुहम्मद अक्रमने त्याला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. अशा प्रकारे वैभव सूर्यवंशीचा हा आक्रमक आणि मनोरंजक डाव ५० धावांवर संपला. तरीही, पाकिस्तानविरुद्धच्या अपयशानंतर केलेले हे पुनरागमन भारतासाठी अत्यंत सकारात्मक ठरले आहे.
 
या सामन्यात भारताच्या अंडर-१९ संघात आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, हरवंश पंगालिया, कनिष्क चौहान, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, उद्धव मोहन आणि किशन कुमार सिंग यांचा समावेश आहे, तर मलेशियाच्या संघाचे नेतृत्व दियाझ पात्रो करत आहे. वैभवच्या या खेळीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिकच वाढलेला दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0