यशदाचे अधिकारी अभ्यासासाठी मिर्झापूर नेरीत!

16 Dec 2025 17:40:14
आर्वी, 
sumit-wankhede : विधानसभा मतदारसंघातील आदर्श ग्राम मिर्झापूर नेरी येथे यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी (यशदा) पुणे अंतर्गत विविध विभागांतील नवोदित व परिविक्षाधीन प्रशासकीय अधिकार्‍यांनी अभ्यास दौरा केला. यावेळी आ. सुमित वानखेडे यांनी अधिकार्‍यांशी मोकळा संवाद साधत गाव केंद्रित विकास, लोकसहभाग आणि प्रभावी प्रशासन या त्रिसूत्रीवर आधारित ग्रामीण परिवर्तनाची दिशा स्पष्ट केली. मिर्झापूर नेरी येथील पंचायत लर्निंग सेंटरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळा सोनटक्के होते तर यशदाचे उपसंचालक शरदचंद्र माळी आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाचे संयोजक सागर वाळुंज यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
JK
 
 
 
या अभ्यास दौर्‍यात ७ गटविकास अधिकारी, ३ सहाय्यक विभागीय आयुत, ५ उपजिल्हाधिकारी, ५ सहायक परिवहन अधिकारी व इतर विभागाच्या २ प्रशासकीय अधिकारी अशा २२ अधिकारी सहभागी झाले होते. या अधिकार्‍यांनी आदर्श ग्राम मिर्झापूर नेरीला भेट देऊन गावातील विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, शाळा आणि अंगणवाडीची पाहणी करत माहिती घेतली.
 
 
सरपंच बाळा सोनटक्के यांनी गावाच्या स्थापनेपासून ते आजवरच्या प्रगतीचा विस्तृत आढावा घेतला आणि गावाच्या विकासाच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण आठवणींना उजाळा दिला. आ. वानखेडे यांनी मिर्झापूर नेरी हे आर्वी मतदारसंघासाठी एक विकासात्मक रोल मॉडेल बनले असल्याबद्दल विशेष आनंद व्यत केला. खर्‍या अर्थाने ग्रामीण परिवर्तन घडवण्यासाठी गाव केंद्रित विकास, लोकसहभाग आणि प्रभावी प्रशासन ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक नवोदित अधिकार्‍याने आपल्या कार्यक्षेत्रात याच तत्त्वांचे पालन करत लोकांच्या सक्रिय सहभागातून सक्षम, आत्मनिर्भर आणि विकसित गावे घडवावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आ. वानखेडे यांनी सहभागी अधिकार्‍यांना त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देत त्यांचे कार्य समाजहितासाठी प्रेरणादायी ठरो, अशी सदिच्छा व्यत केली.
 
 
यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मंगेश कोल्हे, ग्रामपंचायत कर्मचारी शामराव अटेल, मेघा देशमुख, सुषमा कठाने, सविता कठाने, वैशाली सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले. संचालन राजू शेंद्रे यांनी केले तर आभार संजय यावले यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0