आंतरराज्यीय टोळीतील आरोपी गजाआड

-१६.५३ लाखाची आभासी फसवणूक -जामतारात येथून घेतले ताब्यात

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
amravati-news : भारतातील बहुतांश सायबर गुन्हे झारखंडमधील जामताराशी संबंधित असतात. येथून सायबर गुन्हेगारांना अटक करणे अवघड असते. भौगोलिक स्थितीचा फायदा घेत गुन्हेगार हे पोलिसांच्या कारवाईच्या आधीच पळून जाण्यात यशस्वी ठरतात. पण, अमरावती पोलिसांच्या एक पथकाने जामतारा येथे पोहोचून आंतरराज्यीय टोळीतील सायबर गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
 

sDF 
 
 
येथील एका ऑईल मिल मालकाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाण्याचे कनेक्शन कापले जाणार आहे, असा संदेश ९ नोव्हेंबर रोजी पाठवण्यात आला होता. संदेश उघडताच ‘एपीके फाईल लिंक’द्वारे त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला आणि त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून १६.५३ लाख रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. या प्रकरणी तक्रारीच्या आधारे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. या ऑनलाईन फसवणूक प्रकरणाच्या तपासाचे मोठे आव्हान सायबर पोलिसांसमोर होते. फसवणुकीतील काही रक्कम ही क्रेडिट कार्डमध्ये पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले आणि या गुन्ह्यात एकापेक्षा अधिक जण सहभागी असल्याचेही तपासादरम्यान दिसून आले.
 
 
ऑईल मिल मालकाच्या बँक खात्यातून झालेल्या एकूण ९ व्यवहारांपैकी २ व्यवहारातील १.४५ लाख आणि १.२० लाख रुपये क्रेडिट कार्डद्वारे काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले. या क्रेडिट कार्डचे तपशील विविध दलालांमार्फत आरोपी मृणाल उर्फ विक्रम पांडे याच्यापर्यंत पोहवण्यात आले. त्यानंतर आरोपी मृणाल पांडे याने १२ नोव्हेंबरलाा या क्रेडिट कार्ड तपशीलांचा वापर करून फसवणुकीच्या रकमेचे व्यवहार केले. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपी हा झारखंडमधील जामतारा जिल्ह्यातील हरिराखा येथे राहणारा असल्याचे निष्पन्न झाले.
 
 
सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत कासार, हेड कॉन्स्टेबल विशाल, रोशन अनिकेत आणि अश्विन यांचे पथक तपासासाठी झारखंडमध्ये पोहोचले. त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेतला. शिताफीने आरोपी मृणाल पांडे याला डुंबरिया चौक, जामतारा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात १० क्रेडिट आणि डेबिट कार्ड, २ पासबुक, २ चेकबुक, काही आधार कार्डच्या झेरॉक्स, २ मोबाईल फोन आणि रोख १४ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.