व्हेनेझुएलाच्या तेल टँकरवर अमेरिकेचे नाकाबंदीचे आदेश!

17 Dec 2025 09:16:55
वॉशिंग्टन
Ban on Venezuelan oil tankers वॉशिंग्टन आणि व्हेनेझुएलामधील तणाव आणखी तीव्र झाला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये प्रवेश करणाऱ्या आणि तेथून बाहेर पडणाऱ्या तेल टँकरवर पूर्ण नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे दक्षिण अमेरिकेतील या देशाच्या आधीच अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ एक तेल टँकर ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 

trump and venezuela president 
या भागात लष्करी दल तैनात केल्यानंतरचे हे एक असामान्य आणि आक्रमक पाऊल मानले जात आहे. नाकाबंदीची घोषणा करताना ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून व्हेनेझुएलावर गंभीर आरोप केले असून, तेलाच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांना आर्थिक मदत केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, अमेरिकन लष्कराची तैनाती पुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले की, व्हेनेझुएलाला दक्षिण अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नौदल ताफ्याने पूर्णपणे वेढले असून हा ताफा दिवसेंदिवस अधिक मजबूत होत जाईल. त्यांनी असा इशाराही दिला की, अमेरिकेकडून कथितपणे चोरलेले तेल, जमीन आणि इतर मालमत्ता परत न केल्यास व्हेनेझुएलाला अभूतपूर्व परिणामांना सामोरे जावे लागेल.
या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या दबावासमोर देशाने ठामपणे उभे राहिल्याबद्दल अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी व्हेनेझुएलाच्या जनतेचे कौतुक केले आहे. सरकारी दूरदर्शनवर बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या २५ आठवड्यांपासून देशाने मानसिक दहशतवादापासून ते तेल टँकरवर होणाऱ्या हल्ल्यांपर्यंतच्या बहुआयामी आक्रमणांचा सामना केला असून, त्यावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा पुन्हा एकदा व्यक्त करत व्हेनेझुएलामध्ये शांतता आणि स्थैर्य कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे तेल साठे असून देश दररोज सुमारे दहा लाख बॅरल तेल उत्पादन करतो. दीर्घकाळापासून व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने तेलाच्या उत्पन्नावर अवलंबून राहिली आहे. मात्र, २०१७ मध्ये अमेरिकेने तेलविषयक निर्बंध लादल्यानंतर मादुरो सरकारला आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत कच्चे तेल पोहोचवण्यासाठी ध्वज नसलेल्या आणि गुप्त पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या टँकरच्या ताफ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
Powered By Sangraha 9.0