अहिल्यानगर,
Chandan brothers गावखेड्यातील विद्यार्थ्यांचे यश हे नेहमीच प्रेरणादायी ठरते. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील चंदन कुटुंबीयांनी अशीच प्रेरणादायी यशोगाथा रचली आहे. संपूर्ण पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद ठरणारी ही कथा तीन सख्ख्या भावांची असून, तिघेही एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी झाले आहेत.
उखलगाव येथील Chandan brothers दिलीप मालन चंदन, विजय मालन चंदन आणि अजय मालन चंदन हे तिघे भाऊ आज शासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. ज्येष्ठ बंधू दिलीप मालन चंदन हे नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मधले बंधू विजय मालन चंदन हे पुणे शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर धाकटा भाऊ अजय मालन चंदन यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदावर निवड झाली आहे.
चंदन बंधूंनी आपले प्राथमिक शिक्षण उखलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून पूर्ण केले. पुढे अजय मालन चंदन यांनी पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले. मोठ्या भावांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अजयनेही स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला. केडगाव, अहिल्यानगर येथे राहून त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी केली आणि अखेर संयुक्त गट ‘ब’ २०२४ परीक्षेत यश मिळवत राज्य कर निरीक्षक पद पटकावले.
आईचे कष्ट मोलाचे ठरले!
ज्येष्ठ बंधू दिलीप मालन Chandan brothers चंदन यांची २०१० साली एमपीएससीमार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. सुरुवातीला ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तर दुसरे बंधू विजय मालन चंदन यांची २०१२ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. तेही सुरुवातीला शिक्षक होते आणि सध्या पुणे शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.विशेष बाब म्हणजे तिघाही भावांचे शिक्षण त्यांच्या आईने अत्यंत कष्टाने पूर्ण केले. मर्यादित साधनसंपत्ती असूनही शिक्षणाला प्राधान्य देत आईने दिलेले पाठबळ हे या यशामागचे महत्त्वाचे कारण ठरले आहे.आपल्या यशाविषयी अजय मालन चंदन सांगतात की, सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय होते. पदवीच्या काळापासून अभ्यासाचे नियोजन केले होते. मोठ्या भावांचा संघर्ष आणि यश हेच माझ्यासाठी प्रेरणास्थान ठरले. माझ्या यशामागे आई, भाऊ, कुटुंबीय आणि मित्रांचा मोलाचा वाटा आहे. सातत्य, जिद्द, चिकाटी, वेळेचा योग्य उपयोग आणि नियोजन केल्यास स्पर्धा परीक्षेत यश नक्की मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गावातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत तीन सख्खे भाऊ एमपीएससीतून अधिकारी होणे हे दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण ठरत असून, चंदन बंधू आज संपूर्ण परिसरातील तरुणाईसाठी आदर्श बनले आहेत.