धारणी,
Deepak Tamshettywar : रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जात आहे. देशाच्या विविध भागात संघाचे सेवा प्रकल्प सुरू असून सामान्य लोकांनी संघाच्या सेवाकार्यात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन, रा. स्व. विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी केले.
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीद्वारे व हरिगोविंद छात्रावासाच्या माध्यमाने मेळघाटातील दुर्गम क्षेत्रात प्राथमिक उपचार पोहोचविण्यासाठी आरोग्यदूत नावाचे चलचिकित्सालय १६ डिसेंबर रोजी जनतेच्या सेवेत दाखल झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज सातनकर उपस्थित होते. विचारमंचावर सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर राठी, तालुका संघचालक दिलीप सेईवाल व अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश मालवीय आणि रामदास जैस्वाल विराजमान होते. स्वागत आरोग्यदूत प्रमुख डॉ. कमलकिशोर परिहार व छात्रावास समितीचे जयप्रकाश नवलाखे यांनी केले.
१६ डिसेंबर रोजी स्व. शंकरलाल सत्यवादी यांच्याकडून फिरत्या दवाखाण्यासाठी ३० लाखाच्या किंमतीची रुग्णवाहिका व चिकित्सालयाची गाडी मेळघाटच्या सेवेत दाखल झाली. संत जाटू बाबांच्या समाधीचे दर्शन करुन प्रथम वैद्यकीय सेवा बोड मंदिरावर देण्यात आली. ४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तत्पूर्वी धारणी येथील हरिगोविंद छात्रावासाच्या प्रांगणात कार्यक्रम झाला. त्यावेळी डॉ. सातनकर यांनी मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्युचे वास्तव मांडले. आरोग्यदूत उपक्रमाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मेळघाटात उपचार व्यवस्थेतील व्यसनमुक्ती अभियानाची गरज असून कॅन्सरमुळे पण जास्त मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक दीपक भागवत, संचालन लोकेश धनेवार व आभार रतनलाल परिहार यांनी मानले. कार्यक्रमात केदार जोशी, सुनील कथले, रमेश नांदुरकर, हेमंत जैस्वाल, नितेश चरपे, अशोक केदार, जगदीश व अशोक गुप्ता, संदीप व सुशील गुप्ता, डॉ. चंद्रविजय अनासाने, रवि नवलाखे, रसिक पटेल, किशोर नवलाखे, अॅड. धर्मेंद्र सोनी, बंटी जोशी, आप्पा पाटील, डॉ. क्षीरसागर, कमलेश शेलेकर, जतीन पुरोहित, नंदू भिलावेकर, गजू सुडस्कर, सतीश राठौड उपस्थित होते.