शासकीय कृषी महाविद्यालयासाठी आ. बकाने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

17 Dec 2025 19:47:26
देवळी,
devendra-fadnavis : राज्य शासनाच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याच्या धोरणाच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातही शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आ. राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
 
BAKANE
 
 
 
वर्धा जिल्हा हा पूर्णतः शेतीप्रधान जिल्हा असून येथे सुमारे १३ लाखांहून अधिक लोकसंख्या व ८ तालुयांचे व्यापक लाभक्षेत्र आहे. मात्र, इतया मोठ्या जिल्ह्यात सध्या केवळ एकच खाजगी कृषी महाविद्यालय आहे. वाढती विद्यार्थ्यांची संख्या, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी आणि शेतकरी कुटुंबांची शैक्षणिक गरज पूर्ण करण्यात ते अपुरे ठरत आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यांत जावे लागत असून आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पृष्ठभूमीवर आ. राजेश बकाने यांनी आपल्या तालुयातील सेलसुरा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या अखत्यारीतील उपलब्ध जमिनीचा मुद्दा मांडला.
 
 
 
महाविद्यालयासाठी आवश्यक पर्याप्त जमीन उपलब्ध, जिल्हा मुख्यालयाच्या जवळ, राष्ट्रीय महामार्गालगत तसेच वाहतूक, वीज, पाणी व इतर मूलभूत सुविधांनी युत असल्याने सेलसुरा हे ठिकाण शासकीय कृषी महाविद्यालय स्थापनेसाठी अत्यंत योग्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पटवून दिले.
 
 
जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्यास ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कृषी शिक्षण मिळेल, कृषी क्षेत्रात संशोधन, नवतंत्रज्ञान व प्रशिक्षणाला चालना मिळेल, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल तसेच जिल्ह्याच्या कृषी विकासाला गती मिळेल. शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडणे, कृषी क्षेत्र मजबूत करणे आणि राज्याच्या कृषी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे या उद्देशाने या मागणीस मान्यता द्यावी, अशी विनंती आ. राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. वर्धा जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि कृषी शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी ही मागणी अत्यंत महत्त्वाची असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. बकाने यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0