मुंबई,
Ankita Walawalkar भारत-पाकिस्तान संघर्ष आणि हेरगिरीच्या पार्श्वभूमीवर आधारित दिग्दर्शक आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिससह सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेत आहे. प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट दररोज कमाईचे नवे उच्चांक प्रस्थापित करत असून भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरला आहे. चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून, मात्र अक्षय खन्नाने साकारलेला ‘रेहमान डकैत’ हा डॉन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अक्षय खन्नाची एक खास डान्स स्टेप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ‘Day 1 As a Spy in Pakistan’ हा ट्रेंडही जोर धरू लागला आहे.
‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी
या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता वालावलकर यांनी या ट्रेंडवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘स्पाय इन पाकिस्तान’ या संकल्पनेवर आधारित रिल्स तयार करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सवर टीका करताना अंकिता म्हणाल्या की, हेरगिरीचे काम इतके सोपे नाही की त्यावर विनोद किंवा हलक्याफुलक्या रिल्स बनवाव्यात. एका वेगळ्या ओळखीसह शत्रू राष्ट्रात राहून देशसेवा करणाऱ्या गुप्तहेरांचे आयुष्य सतत तणावाखाली असते. कुटुंबापासून दूर राहून, क्षणाक्षणाला जीव धोक्यात घालून देशासाठी काम करणे हे अत्यंत कठीण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अंकिता यांनी Ankita Walawalkar पुढे सांगितले की, आजचे जग फेम आणि क्रेडिटभोवती फिरते; मात्र या गुप्तहेरांना कोणतेही श्रेय किंवा प्रसिद्धी मिळत नाही. “आपण त्या जागी असतो, तर ते काम करू शकलो असतो का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी तरुणांना थोडे वाचन करण्याचे आवाहन केले. विशेषतः ‘ब्लॅक टायगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय गुप्तहेर रविंद्र कौशिक यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ट्रेंड म्हणून रिल्स बनवण्याऐवजी या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा आधीच झाली असून, पहिल्याच भागाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर, प्रेक्षकच समीक्षक बनले असून चित्रपटाच्या सकारात्मक बाजू मांडताना विरोधकांनाही ते ठोस प्रत्युत्तर देत आहेत. बॉक्स ऑफिसवरील यश, कलाकारांची दमदार कामगिरी आणि सोशल मीडियावरील चर्चेमुळे ‘धुरंधर’ सध्या मनोरंजन विश्वात केंद्रस्थानी राहिला आहे.