हम होंगे कामयाब हर एक दिन : डॉ. वेदप्रकाश मिश्रा

17 Dec 2025 17:21:38
पुलगाव,

Dr. Vedprakash Mishra नेपोलियन बोनापार्ट म्हणतात, तुम्ही मला एक चांगली माता द्या मी तुम्हाला चांगले राष्ट्र देईन. आचार्य चाणय म्हणतात तुम्ही मला चांगले शिक्षक द्या, मी तुम्हाला उत्तम राष्ट्र देईन. आपल्याला मात्र मला चांगले मातृतुल्य शिक्षक द्या मी तुम्हाला एक अभूतपूर्व राष्ट्र देईन असे वाटते. केवळ वर्गात धडा शिकवण्यापुरतीच शिक्षकाची जबाबदारी मर्यादित राहत नाही. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, उदात्त विचार आणि भक्कम जीवनमूल्ये देऊन उत्तम समाज आणि उत्कृष्ट राष्ट्रनिर्मिती करणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शिक्षकाच्या खांद्यावर आहे. आता विद्यार्थ्यांनी हम होंगे कामयाब एक दिन ऐवजी हम होंगे कामयाब हर एक दिन म्हणण्याचे दिवस असल्याचे मार्गदर्शन दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च नागपूर येथील प्रो. चान्सलर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
 
 

Dr. Vedprakash Mishra 
स्थानिक आर. के. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुलगाव येथे दहावी व बारावी मार्च २०२५ बोर्डाच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष रंजनकुमार केजडीवाल होते तर प्रमुख अतिथी म्हणून तरुण भारतचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास यांची उपस्थिती होती. प्राचार्य माया वंडलकर, उपप्राचार्य सुनील भोयर, मुख्याध्यापक नितीन श्रीवास, सुबोध चचाणे, जितेंद्र वर्मा, प्रिती बिडकर, प्रनिता कोंबे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
प्रफुल्ल व्यास यांनी विद्यार्थ्यांनी आई, वडील आणि गुरुजनांचा आदर करावा असे सांगितले. तसेच जगाच्या पाठीवर आज महान म्हणून ओळख असलेले आयुष्याच्या सुरुवातीला अपयशी झाले असल्याचे सदोहरण सांगितले. त्यामुळे अपयश आले म्हणून थांबून न जातात त्याला तुडवत यशाचा मार्ग पत्करण्याचे आवाहन केले. रंजनकुमार केजडीवाल यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवराच्या हस्ते प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, रोख रक्कम, भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आर. के. ज्ञानमंदिरमच्या दहावीच्या परीक्षेत प्रथम येणारी कुमारी श्रद्धा दुबे, द्वितीय अनुष्का जुमडे, तृतीय अभिषेक एखंडे तसेच आर. के. हायस्कूल पुलगावच्या दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम येणारी सानिका अनकर, द्वितीय चेतन गांजरे व श्रवणकुमार कळसकर, तृतीय श्रेया भोगेकार यांचा सत्कार करण्यात आला. बारावी विज्ञान शाखेतून प्रथम येणारी सोनल गांजरे, वाणिज्य शाखेतून प्रथम देवयानी भोगेकार, कला शाखेतून प्रथम येणारा स्वराज तिडके यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मैदानी स्पर्धामध्ये यश मिळवणार्‍या छकुली सोनवणे व मोहिनी चुटे यांना त्यांच्या यशाबद्दल गौरवण्यात आले.
 
 
कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक, देणगीदार, माजी शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संचालन स्वाती कावडकर तर आभार हितेश पैकीने यांनी मानले.
 
 

शेतकर्‍याच्या मुला, मुलीला बक्षिसाची खैरात
 
 
शेती वा शेतकर्‍याच्या मुलांविषयी कायम उपरोधिक बोेलले जाते. परंतु, येथील बक्षीस वितरणात शेतकर्‍याच्या मुलानेच नव्हे तर मुलीनेही तगडे बक्षिसं पटकावली. शेतकर्‍याची मुलगी तब्बल १३ बक्षिसांची मानकरी ठरली. त्याच बरोबरीत मुलानेही बक्षीस पटकावले. या सोहळ्यात बहीण-भाऊ उपस्थित नसल्याने त्यांच्या पालकांनी हे बक्षिसं स्विकारले.
Powered By Sangraha 9.0