गोंदिया,
Gondia molestation case, जवळील फुलचूर परिसरातील दत्त मंदिरजवळ २८ मे २०१४ रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास महिलेचा विनयभंग प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) के. व्ही. शेंडे यांनी १ वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा १६ डिसेंबर रोजी सुनावली. देवेंद्र हिवराज महाजन (३५), रा. दत्त मंदिराजवळ, फुलचूर असे शिक्षा ठोठावण्या आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित महिला तिच्या घरासमोरील अंगणात झोपली असताना आरोपी देवेंद्रने तिचे तोंड दाबून शरीराच्या खासगी भागास स्पर्श करून विनयभंग केल्याची तक्रार पिडीतेने पोलिसात केली होती. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस स्टेशन येथे भादंविचे कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीस अटक करून सबळ पुरावे गोळा करण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सुनावणीदरम्यान साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी आढळून आल्याने न्यायालयाने १ वर्ष सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्ह्यांचा तपास तत्कालीन पोलिस हवालदार जगदीश वैरागडे यांनी केला होता. खटल्यातील युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता रंजना शुक्ला यांनी सहायक संचालक सतीश घोडे यांच्या मार्गदर्शनात केला. न्यायालयीन कामकाजात महिला पोलिस शिपाई शिल्पा साखरे व इंशा जयस्वाल यांनी सहकार्य केले