नवी दिल्ली,
health of the star Indian opener आयपीएल लिलावाच्या गडबडीत क्रिकेटविश्व व्यस्त असतानाच भारतीय संघाचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वाल याच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग सामन्यानंतर अचानक प्रकृती खालावल्याने जयस्वालला रुग्णालयात दाखल करावे लागले. वृत्तानुसार, मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामना संपल्यानंतर काही तासांतच यशस्वी जयस्वालला पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. माहितीनुसार, सामन्यादरम्यानच जयस्वाल अस्वस्थ होता आणि पोटदुखीची तक्रार करत होता. सामना संपल्यानंतर वेदना अधिक वाढल्याने त्याला तातडीने पिंपरी-चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस असल्याचे निदान केले. २३ वर्षीय फलंदाजावर ड्रिपद्वारे उपचार करण्यात आले असून अल्ट्रासाऊंड आणि सीटी स्कॅनसह आवश्यक तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या त्याला औषधोपचार सुरू ठेवण्यासोबतच पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आजारी अवस्थेतही यशस्वी जयस्वालने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला होता. २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने १६ चेंडूत १५ धावा केल्या. या सामन्यात मुंबईने तीन विकेटने विजय मिळवला. कर्णधार अजिंक्य रहाणेची नाबाद ७२ धावांची खेळी आणि सरफराज खानने अवघ्या २२ चेंडूत केलेल्या ७३ धावांनी मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मात्र, या विजय असूनही मुंबई संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
संपूर्ण सामन्यात जयस्वाल प्रकृतीने खूपच अस्वस्थ दिसत होता, अशी माहितीही समोर आली आहे. सामन्यानंतर वेदना वाढत गेल्याने त्याला त्वरित वैद्यकीय मदतीची गरज भासली. त्याच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही, मात्र लवकरच यासंदर्भात अपडेट मिळण्याची शक्यता आहे. अलीकडील कामगिरीकडे पाहिले तर, यशस्वी जयस्वाल उत्तम फॉर्ममध्ये आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने तीन सामन्यांत ४८.३३ च्या सरासरीने आणि १६८.६ च्या स्ट्राईक रेटने एकूण १४५ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अलीकडील एकदिवसीय मालिकेतही त्याने तीन सामन्यांत ७८ च्या सरासरीने १५६ धावा करत आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावले होते.