नवी दिल्ली,
Homebound Oscar opportunity ऑस्करच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या “होमबाउंड” या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल घेतली असून, ९८ व्या अकादमी पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या श्रेणीसाठी तो शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे. इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका ठरला आहे. मंगळवारी अकादमीकडून विविध १२ श्रेणींसाठी शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म विभागात एकूण १५ चित्रपटांची निवड झाली आहे. यामधून अंतिम पाच चित्रपटांची नामांकनासाठी निवड केली जाणार असून, त्याची घोषणा २२ जानेवारी रोजी होणार आहे.
या शर्यतीत भारताच्या “होमबाउंड”सोबत अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इराक, जपान, जॉर्डन, नॉर्वे, पॅलेस्टाईन, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वित्झर्लंड, तैवान आणि ट्युनिशिया येथील चित्रपटांचा समावेश आहे. या यादीत स्थान मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक नीरज घायवान यांनी यावर आपली भावना व्यक्त केली आहे. दिग्दर्शक नीरज घायवान यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला. जगभरातून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आणि “होमबाउंड”ला मिळालेली ही संधी संपूर्ण टीमसाठी अभिमानाची असल्याचे सांगितले.