पाच अवैध सावकारांची पोलिस कोठडीत रवानगी

17 Dec 2025 19:21:25
चंद्रपूर/ब्रम्हपुरी, 
Illegal moneylender : नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील 36 वर्षीय शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडणी विकल्याचे प्रकरण उघकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस यंत्रणाही सक्रिय झाली असून, सहा पैकी पाच अवैध सावकारांना मंगळवारी अटक करण्यात आली. बुधवार, 17 डिसेंबरला या सर्व आरोपींना ब्रम्हपुरी येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 

CHAND 
 
ब्रम्हपुरी शहरात अवैध सावकारी करून कर्जदारांची अमानुष पद्धतीने आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक केल्याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात 6 अवैध सावकारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे (42, रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी) हा अद्यापही फरार आहे.
 
 
उर्वरित आरोपी किशोर रामभाऊ बावणकुळे (42, रा. कुर्झा वॉर्ड, ब्रम्हपुरी), लक्ष्मण पुंडलिक उरकुडे (47, रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी), प्रदीप रामभाऊ बावणकुळे (38, रा. देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी), संजय विठोबा बल्लारपुरे (50, रा. फवारा चौक, पटेल नगर, ब्रम्हपुरी) आणि सत्यवान रामरतन बोरकर (रा. टेकरी, ता. सिंदेवाही, ह. मु. चांदगाव रोड, ब्रम्हपुरी) हे आता पोलिस कोठडीत आहेत.
 
 
रोशन कुळे यांनी, 16 डिसेंबर रोजी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, 2 फेब्रुवारी 2021 रोजी ब्रम्हपुरी येथील एका सावकाराकडून त्यांनी 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापैकी 15 हजार रुपये 31 मार्च 2021 रोजी त्यांनी परत केले. मात्र, उर्वरित 85 हजार रुपये वेळेत न भरल्याने सावकाराने 20 टक्के दराने व्याज व दररोज 5 हजार रुपये दंड आकारण्याची धमकी दिली. पैसे न दिल्यास घरातील मौल्यवान वस्तू उचलून नेण्याचीही तंबी दिली. या दबावामुळे फिर्यादीने वेगवेगळ्या सावकारांकडून कर्ज घेतले. या सावकारांना पैसे देण्यासाठी आतापर्यंत सुमारे 48 लाख 53 हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. सावकारांकडून रोशन कुळे यांच्यावर एकूण 74 लाख कर्ज दाखवण्यात येत आहे.
 
 
सावकारी कर्जापायी आणि आर्थिक विवंचनेमुळे फिर्यादी रोशन कुळे यांनी, कंबोडिया येथे जाऊन स्वतःची किडनी विकल्याचा धक्कादायक आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, सन 2021 ते जून 2023 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली रोशन कडून केली. वसुलीसाठी फिर्यादीस डांबून ठेवून अश्लिल शिवीगाळ करीत मारहाणही करण्यात आली व गंभीर दुखापत करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
 
 
या प्रकरणी 6 आरोपींविरूध्द ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात कलम 387, 342, 294, 506, 120 (ब), 326 भादंवि आणि कलम 39, 44 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले करीत आहेत.
 
 
जर कोणी अवैध सावकार मुद्दलाच्या रकमेवर अव्वाचे सव्वा व्याज आकारून आर्थिक, शारीरिक व मानसिक छळ करीत असेल, तर तात्काळ पोलिस नियंत्रण कक्ष 112 किंवा 7887890100 या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
 
मानवी अवयव तस्करीच्याही दिशेने तपास सुरू ः मुमक्का सुदर्शन
 
अवैध सावकारी प्रकरणी पोलिसांची एक चमू सखोल तपास करीतच आहे. शिवाय किडनी विकण्याचा सल्ला रोशन यांना कुणी दिला, कुणी त्यांना कंबोडिया येथे किडनी विकण्यासाठी बाध्य केले, किडनी काढणारे डॉक्टर कोण होते याही दिशेने दुसरी चमू तपास करीत आहे. किडनी कंबोडियात विकली गेली असेल, तर हे प्रकरण मानवी अवयव तस्करीचेही ठरते. त्यामुळे याही दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, रोशन कुळे यांची वैद्यकीय तपासणी झाली. त्यात त्यांची एक किडनी काढल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्य तांत्रिक बाबींचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तभाशी बोलताना दिली.
Powered By Sangraha 9.0