कुर्‍हा - तिवसा मार्गावर भीषण अपघात

एकाचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
तिवसा, 
accident : कुर्‍हा - तिवसा मार्गावरील वाठोडा खुर्द गावाजवळ मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास दुचाकी व दोन कारचा भीषण अपघात झाला. या साखळी अपघातात अनिल शेषराव खारकर (वय ६६, रा. वाठोडा खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
 
 
YTJT
 
प्राप्त माहितीनुसार, घोटा येथील अजय बबन चव्हाण (वय ३०), रोशन श्रीधर चव्हाण (वय २९) व शुभम विजय इंगोले (वय ३०) हे तिघे एमएच २७ बीए १०५६ क्रमांकाच्या युनिकॉन दुचाकीने गावी परतत होते. त्याचवेळी कुर्‍हाकडून तिवसाकडे येणार्‍या एमएच २७ एआर ३५०२ क्रमांकाच्या नेनो कारशी दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही मित्र गंभीर जखमी झाले.
 
 
अपघातानंतर मदतीसाठी वाठोडा खुर्द येथील युवक काँग्रेसचे लुकेश केने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, तिवसाकडून येणार्‍या एमएच ३४ एएम ५४७७ क्रमांकाच्या भरधाव स्कोडा कारने केने यांच्या स्विफ्ट डिझायर कारला जबर धडक दिली. या धडकेत अनिल खारकर व निलेश केशवराव लोंदे (वय ४२, रा. वाठोडा खुर्द) गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच अनिल खारकर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या अपघातात नेनो कारचालक चंद्रशेखर मनोहर ठाकूर (वय ५४, रा. सातरगाव), स्कोडा कारचालक दीपक सुभाष पडोळे (वय ३६, रा. कुर्‍हा) तसेच दुचाकीवरील तिघे मित्र आणि निलेश लोंदे असे एकूण सहा जण जखमी झाले आहेत.
 
 
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविले. मृतक अनिल खारकर यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून दोन्ही कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावरील वेगमर्यादा व वाहतूक सुरक्षेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.