कूर्म पुराण

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
 धर्म-संस्कृती 
 
kurma purana पुराणातील तत्त्वज्ञान मोठ्या प्रमाणात जगासमोर आले ते नैमिषारण्यातील शौनकादी अठ्ठ्यांशी हजार ऋषींसमोर महामुनी सुतांनी सांगितल्यामुळे. व्यासांनी रचिलेल्या अठरा पुराणांमुळे भारतीय संस्कृतीचा विश्वसंचारही आणि विश्वव्यापकत्वही कळते. कूर्म पुराण अठरा पुराणातील नितांत सुंदर पुराण असून यात भगवान विष्णूंच्या दुसऱ्या अवताराचे प्रयोजन मांडले आहे. पहिल्या मत्स्य अवतारात भगवंत फक्त पाण्याशी मर्यादित होते. दुसरा कूर्म अवतार हा पाण्यात आणि भूतलावरही संचार करू शकणारा उभयचर अवतार आहे. कूर्म पुराणात याच कच्छ म्हणजे कासव अवताराचे प्रयोजन आहे. विशेष म्हणजे कूर्म पुराण स्वयं कूर्मनारायण भगवंतांनी दोनदा सांगितले आहे.
‘माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु ।’
स्वयं कूर्मभगवंतांनी सांगितले त्यामुळे हे कूर्म पुराण आहे.
‘नमस्ते कूर्मरूपाय विष्णवे परमात्मने ।
नारायणाय विश्वाय वासुदेवाय ते नमः ।।’
 
 
 
कूर्म पूराण
 
 
अवताराचीही गोड कथा या पुराणात आहे. ऋषी दुर्वासांच्या शापाने देवांची शक्ती क्षीण होऊ लागली. दिव्य ऊर्जा मिळावी म्हणून भगवान विष्णूंनी समुद्रमंथनातून अमृत काढण्याचा सल्ला दिला. समुद्रमंथन एकट्या देवांकडून शक्य नसल्याने दानवांची मदत घेण्याचे ठरले. देव आणि दानवात अमृतासाठी आपसात सहमती झाली. त्यानुसार क्षीरसागर घुसळून त्यातून अमृत बाहेर काढायचे आणि ते आपसात वाटून घ्यायचे. समुद्र घुसळण्यासाठी मंद्राचल पर्वताची रई आणि नागराज वासुषीचा दोर करण्याचे ठरले. समुद्रमंथन करताना मंद्राचल पर्वत खाली खाली जाऊ लागला. त्याला आधार देण्यासाठी भगवान विष्णू नारायणांनी कासव रूप धारण करून मंदाचल पर्वताला आपल्या पाठीचा आधार देऊन समुद्रमंथन निर्विघ्न पार पाडले.
 
समुद्र मंथनातून अमृतासोबत हलाहलदेखील निघाले. त्यासोबतच पारिजात वृक्ष, कौस्तुभ मणी, ऐरावत हत्ती, उच्चैश्रवा अश्व, कामधेनू, चंद्रमा, पांचजन्य यासोबतच भगवान धन्वंतरीही निघाले. सर्वात मुख्य म्हणजे समुद्रमंथनातून भगवंतांची आद्याशक्ती आदिमाया श्रीलक्ष्मी प्रकट झाल्या. समुद्रमंथनाच्या वेळी नारायण भगवंतांनी जे कच्छ रूप धारण केले त्याला कूर्मावतार म्हणतात. या अवताराच्या अनुषंगाने विविध विषय ज्या पुराणात आलेत, त्या पुराणाला कूर्मपुराण म्हणतात.
या पुराणाचे एकूण 18,000 श्लोक असून ते दोन खंडात विभाजित आहेत. पूर्वखंडाचे 51 अध्याय तर उत्तर खंडाचे 44 अध्याय असे एकूण 95 अध्याय आहेत. कूर्म पुराण स्वयं भगवान कूर्मनारायणांनी राजा इंद्रद्युम्न यांना आणि त्यानंतर स्वत: कूर्म भगवंतांनीच नारदादी ऋषींना सांगितले. हेच पुराण त्यानंतर नैमिषारण्यात महर्षी व्यासांच्या आज्ञेनुसार सुत महाशयांनी शौनकादी ऋषींना सांगितले.
 
या पुराणात हलाहल प्राशन करणारे शिव, स्वयं विष्णू आणि आदिशक्ती श्रीलक्ष्मी यांचा प्रभाव असल्यामुळे हे पुराण शैव, वैष्णव आणि शाक्त यांचा समन्वय साधणारे एकात्मता स्तोत्र आहे. याच पुराणात भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या ईश्वर गीता आणि व्यास गीता विशद केल्या आहेत. इतर पुराणांप्रमाणे याही पुराणात ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे अवतीर्ण आणि सोबतच सृष्टीची आणि ब्रह्मांडाची निर्मिती सांगितली आहे. तीर्थ आणि व्रतांचे महत्त्व आहे. विविध राजे आणि त्यांचे वंश यावर माहिती आहे. दक्षयज्ञ विध्वंस, भगवान वामन आणि दानवेंद्र बळीराजा प्रकरण या पुराणात आहे. नद्या, पर्वत, द्वीप, सागर, पुरी याचे वर्णन आहे. धर्माचरण, भक्षाभक्ष, सदाचार, प्रायश्चित्त या बाबी कूर्म पुराणात आहेत. योग आणि भक्ती मार्ग आहे. नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण आहे.
 
गंगेचे आगमन, चार युगे, चार आश्रम यांचे वर्णन आहे. निष्काम कर्मयोग, ज्ञान आणि सांख्ययोग विचार आहे. वेद उत्पत्ती, ब्रह्माचे पुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार यांची माहिती. वराह अवतार, नृसिंह अवतार, भक्त प्रल्हाद, मधू आणि कैटभ या राक्षसांचा वध अशा अनेक बाबी आहेत. नवीन पिढीने अभ्यासावी अशी कालगणना या पुराणात आहे. कूर्म पुराणाच्या पूर्वभागात पाचव्या अध्यायात एकूण 26 श्लोक आहेत. त्यात ब्रह्मदेवाचे वय, दिवस, मन्वंतर, युग, कल्प यांचे दिनमान सांगितले आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य 1 पर आहे. या पराचा अर्धा भाग म्हणजे परार्ध आहे. सध्या द्वितीय परार्ध सुरू आहे.
कालगणना निमिषपासून सुरू होते. 15 निमिष म्हणजे 1 काष्ठा. 30 काष्ठा म्हणजे 1 कला. 30 कला म्हणजे 1 मुहूर्त. 30 मुहूर्त म्हणजे 1 अहोरात्र. 30 अहोरात्र म्हणजे 1 मास. 6 मास म्हणजे एक अयन. दक्षिण अयन आणि उत्तर अयन मिळून 2 अयनांचे एक वर्ष होते. याला दिव्य वर्ष म्हणतात. हे दिव्य वर्ष आपल्या 360 वर्षाइतके असते.kurma purana असे 12,000 दिव्यवर्ष म्हणजे एक चतुर्युग होईल.(सत्य, द्वापार, त्रेता आणि कलियुग) असे 71 चतुर्युग म्हणजे 1 मन्वंतर होय. ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे 14 मन्वंतरे ज्याला 1 कल्प म्हणतात. साधारणत: 4.32 अब्ज मानव वर्ष होते. असे 360 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे एक वर्ष होईल. असे 100 ब्रह्मदेवाचे वर्ष म्हणजे एक पर होईल.
 
सध्या कली युगाचा प्रथम चरण, श्रीश्वेतवाराह कल्प वैवस्वत मन्वंतर, द्वितीय परार्ध सुरू आहे. कालगणनेसोबतच भगवान धन्वंतरी अर्थात औषधिशास्त्र, आयुर्वेद, शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र ही सर्व देण कूर्म पुराणाची आहे. कूर्म पुराणात सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर, वंशानुचरित ही पाच पुराण लक्षणे आहेत. याच पुराणात ज्ञान, भक्ती आणि मोक्षमार्गाचा त्रिवेणी संगम आहे. भारताचा भूगोल या पुराणात असून त्यानुसार अखंड भारताचा सिद्धांत भौगोलिक, नैसर्गिक, सांस्कृतिक, हवामान, नद्या आणि पर्वते याचा विचार केला तर कसा सोयीचा आहे, हे लक्षात येते.
 
कूर्म पुराणातून कासव जसा शांत, धैर्यपूर्वक आणि आत्मविश्वासाने चालतो. तो जसा स्थिर भाव ठेवतो; प्रसंगी स्वत:ला आकुंचित करतो. आपल्या पाठीवरची जबाबदारी कठोरपणे सांभाळतो. आपणही जीवनात तसेच वागण्याची आवश्यकता आहे. पाठीची ढाल करता यावी हा धडा इथेच मिळतो. कूर्म पुराण अजून एक महत्त्वाचा संदेश देते. आपल्या जीवनात नित्य मंथन असते. त्या मंथनातून अमृत येतेच; त्यासाठी प्रथम हलाहल पचविण्याची क्षमता आणि तयारी ठेवावी लागेल. संसार हाच हलाहल असून तो पचवत पचवत आपण पुढे जातो. पण आपल्या जवळ असलेले ईश्वररूपी अमृत आपण ओळखत नाही.
‘बहू मृगजळ देखोनी डोळा,
थुंकीजे जे अमृताचा गिळिता गराला!’
संसाराच्या मृगजळामागे धावताना तोंडात असलेला अमृताचा गुराळा आपण थुंकून देतो. कूर्म पुराण शाश्वत सत्यकथन करते.
‘एतत् पुराणं परमं भषितं कूर्मरूपिणा ।
साक्षात् देवादि देवेण विष्णुना विश्व योनिना ।
यः पठेत सततं मर्त्यो नियमेन समाहितः ।
सर्व पाप विनिर्मुक्तो ब्रह्म लोके महीयते ।।’
कूर्म पुराण स्वयं कूर्म नारायण भगवंतांनी कथन केल्यामुळे त्याचा अभ्यास, वाचन मोक्षप्राप्तीचा मार्ग प्रदान करते.
प्रा. दिलीप जोशी
9822262735
---