भारतातील पहिली फेमिना मिस इंडियाचे निधन

17 Dec 2025 16:46:10
मुंबई,
Meher Castelino भारताच्या सौंदर्यस्पर्धा आणि फॅशन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपुष्टात आले आहे. पहिल्या फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांचे वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती फेमिना मिस इंडिया ऑर्गनायझेशनने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजद्वारे दिली. या वृत्तामुळे भारतीय फॅशन आणि सौंदर्यस्पर्धा विश्वात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
 

Meher Castelino 
१९६४ साली फेमिना मिस इंडियाचा पहिला मुकुट जिंकून इतिहास घडवणाऱ्या मेहर कॅस्टेलिनो या केवळ सौंदर्यवती नव्हत्या, तर त्या एक मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होत्या. त्यांच्या निधनाचे नेमके कारण जाहीर करण्यात आले नसले तरी, वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांचे निधन झाल्याचे प्राथमिक अहवालांतून समोर आले आहे.फेमिना मिस इंडिया ऑर्गनायझेशनने शेअर केलेल्या श्रद्धांजलीपर पोस्टमध्ये म्हटले आहे की, “१९६४ च्या फेमिना मिस इंडिया आणि आमच्या पहिल्या विजेत्या मेहर कॅस्टेलिनो यांच्या निधनाने आम्हाला अतिशय दुःख झाले आहे. त्यांनी पुढील पिढ्यांसाठी नवे मार्ग खुले केले आणि महिलांना निर्भयपणे स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास दिला. त्यांनी सुरू केलेला प्रवास आणि त्यांनी साकारलेली स्वप्ने त्यांच्या वारशाच्या रूपाने सदैव जिवंत राहतील.”
 
 
मिस इंडिया वर्ल्ड २०२५ नंदिनी गुप्ता यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत मेहर कॅस्टेलिनो यांना श्रद्धांजली वाहिली. “त्यांनी आपल्या सर्वांसाठी मार्ग मोकळा केला. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, मॅडम,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
 
 
मेहर कॅस्टेलिनो यांचा जन्म मुंबईत झाला होता. त्यांनी लव्हडेल येथील प्रतिष्ठित लॉरेन्स स्कूलमधून शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या काही काळात त्यांनी १९६४ मध्ये पहिला फेमिना मिस इंडियाचा मुकुट जिंकत इतिहास रचला. यानंतर त्यांनी मिस युनिव्हर्स आणि मिस युनायटेड नेशन्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.फेमिना मिस इंडिया विजेतेपदानंतर त्यांनी फॅशन विश्वात एक भक्कम कारकीर्द उभी केली. जगभरात त्यांनी २००० हून अधिक लाईव्ह फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला. भारतीय मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.मेहर कॅस्टेलिनो यांच्या निधनाने केवळ एका सौंदर्यवतीचा नव्हे, तर भारतीय फॅशन इतिहासातील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यामुळे आणि वारशामुळे त्या सदैव स्मरणात राहतील.
Powered By Sangraha 9.0