भारतीय चाहत्यांच्या प्रेमाने भारावला मेस्सी...म्हणाला धन्यवाद VIDEO

17 Dec 2025 09:50:08
नवी दिल्ली,
Messi's tweet for India अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी याने आपल्या “GOAT इंडिया टूर”दरम्यान भारतीय चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल भारताचे मनापासून आभार मानले आहेत. या दौऱ्यात मेस्सीने भारतातील फुटबॉलप्रेमींना अक्षरशः वेड लावले. १३ डिसेंबर रोजी कोलकात्यात सुरू झालेला हा दौरा १६ डिसेंबर रोजी वांतारा येथे संपला. या चार दिवसांच्या कालावधीत कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथे मेस्सीला पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर प्रचंड उत्साह आणि गर्दी पाहायला मिळाली आणि हा दौरा मेस्सीसाठी तसेच भारतीय चाहत्यांसाठीही अविस्मरणीय ठरला.
 

Messi 
 
 
भारत दौऱ्याच्या आठवणी ताज्या करत मेस्सीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने “नमस्ते इंडिया” असे म्हणत दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथील अनुभव अत्यंत अद्भुत असल्याचे सांगितले. संपूर्ण दौऱ्यात मिळालेल्या प्रेम, आदरातिथ्य आणि स्वागताबद्दल त्याने भारतीय चाहत्यांचे आभार मानले. भारतातील फुटबॉलचे भविष्य उज्ज्वल असेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. मेस्सीच्या या शब्दांनी भारतीय फुटबॉलप्रेमींमध्ये उत्साहाची लाट पसरली असून, ही भेट भारतातील फुटबॉलच्या वाढत्या लोकप्रियतेसाठी महत्त्वाची ठरली आहे.
 
 
 
याशिवाय मेस्सीने एक व्हिडिओही पोस्ट केला असून, त्यामध्ये त्याने सांगितले की भारताला भेट देणे हा त्याच्यासाठी आणि इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉलसाठी एक अद्भुत अनुभव होता. गेल्या काही दिवसांत मिळालेल्या प्रेमाबद्दल तो भारताचा मनापासून आभारी असल्याचे त्याने नमूद केले. हा दौरा जरी लहान असला तरी त्यातून मिळालेला अनुभव आणि प्रेम खूप मोठे असल्याचे मेस्सीने सांगितले. मेस्सीने पुढे म्हटले की, इतके प्रेम मिळेल याची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात ते अनुभवणे अत्यंत आश्चर्यकारक होते. भारतीय चाहत्यांनी केलेले स्वागत आणि दाखवलेला उत्साह तो कधीही विसरणार नसल्याचे त्याने सांगितले. या दौऱ्यात मिळालेले सर्व प्रेम आम्ही आमच्यासोबत घेऊन जात आहोत, असे सांगत भविष्यात पुन्हा भारतात येऊन एखादा सामना खेळण्याची आशाही मेस्सीने व्यक्त केली. या शब्दांनी भारतीय चाहत्यांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0