वाशीम,
Municipal administration Maharashtra नगरप्रशासन हे थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावरील प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण, वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व इतर मूलभूत नागरी सुविधा या बाबींमध्ये कोणतीही तडजोड न करता नागरिकांना दर्जेदार सेवा देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रलंबित विकासकामांना तातडीने गती देऊन करसंकलन, ई-गव्हर्नन्स व तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवावी, नागरिक सुविधांना प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नगर प्रशासन विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील विकासकामे, मूलभूत नागरी सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, करसंकलन तसेच प्रशासकीय कार्यपद्धती यांचा सखोल विचार करण्यात आला. जिल्हाधिकार्यांनी प्रलंबित विकासकामांची यादी तपासून ती ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गुणवत्तापूर्ण काम, पारदर्शकता व वेळेचे काटेकोर पालन यावर त्यांनी भर दिला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेचे निकष काटेकोरपणे राबवावेत, शहरातील कचरा संकलन व वर्गीकरण नियमित व्हावे तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता कायम ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पाणीपुरवठ्याबाबत बोलताना नागरिकांना नियमित, पुरेशा दाबाने व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. उन्हाळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचे नियोजन, गळती रोखणे व पर्यायी जलस्रोतांचा वापर यावर विशेष लक्ष देण्याचेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले. यासोबतच रस्ते, ड्रेनेज, प्रकाश व्यवस्था यांसारख्या नागरी सुविधांच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. करसंकलन वाढीसाठी प्रभावी नियोजन राबवावे, थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घ्यावी तसेच ई-गव्हर्नन्स व ऑनलाईन सेवांचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना सुलभ सेवा द्याव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकार्यांनी दिले. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आढावा बैठकीस नगरप्रशासन विभागाचे सह आयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड यांच्यासह सर्व नगरपरिषद व नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.