तहसीलदारांच्या सूचनेनंतर नाफेड सोयाबीन खरेदीला गती

17 Dec 2025 17:39:24
कारंजा लाड,
NAFED soybean procurement नाफेडमार्फत सुरू असलेल्या सोयाबीन खरेदी प्रक्रियेचा वेग वाढविण्यासाठी तहसील प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. तहसीलदारांनी प्रत्यक्ष खरेदी केंद्राला भेट देऊन दिलेल्या सूचनांनंतर कारंजा येथील नाफेड सोयाबीन खरेदीला लक्षणीय गती मिळाली आहे.आतापर्यंत २३० शेतकर्‍यांकडून एकूण ४६९८ क्विंटल सोयाबीनची खरेदी यशस्वीरीत्या करण्यात आली असून, १६७९ शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. सुरुवातीला खरेदी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र तहसीलदारांनी प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर पाहणी करत संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या स्पष्ट सूचना दिल्यानंतर खरेदी प्रक्रियेत वेग आला आहे.
 

NAFED soybean procurement 
तहसीलदारांनी खरेदी दरम्यान येणार्‍या तांत्रिक अडचणी, वजन मोजणी, शेतकर्‍यांच्या रांगा, नोंदणी प्रक्रिया तसेच कर्मचारी उपलब्धतेबाबत सविस्तर आढावा घेतला. शेतकर्‍यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, खरेदी पारदर्शक आणि वेळेत व्हावी, यावर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या होत्या. नाफेड खरेदी ही शेतकर्‍यांसाठी आधारभाव मिळवून देणारी महत्त्वाची योजना असल्याने तिची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. कारंजा खरेदी केंद्रावर खरेदीचा वेग वाढल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळत असून, येत्या काळात अधिक शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदीत समावेश होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनस्तरावरून केलेल्या हस्तक्षेपामुळे खरेदी प्रक्रिया गतिमान होऊ शकते, हे कारंजा येथील उदाहरणातून स्पष्ट झाले असून, इतर खरेदी केंद्रांवरही अशाच प्रकारची कार्यपद्धती राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. खरेदीची गती वाढविण्यासाठी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, उपाध्यक्ष वसंतराव लळे ,व्यवस्थापक आशिष ठाकरे आणि संचालकांनी परिश्रम घेतले.
१३४९ शेतकर्‍यांना मोजणीची प्रतीक्षा
कारंजा खरेदी केंद्रावर हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी आतापर्यंत ४६९८ शेतकर्‍यांनी नोंदणी केली त्यापैकी २३० शेतकर्‍यांच्या सोयाबीनची मोजणी झाली आणि १३४९ शेतकरी अद्यापही मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत तहसीलदारांच्या सूचनेनंतर सोयाबीन मोजणीची गती वाढल्याने लवकरच उर्वरित १३४९ शेतकर्‍यांच्या मोजणीची प्रतीक्षा देखील संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.
.
Powered By Sangraha 9.0