नागपूर,
apar-abc-id : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपार आयडी/एबीसी आयडी तयार करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी रातुम नागपूर विद्यापीठातर्फे जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांची सुरुवात गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर पासून होत असून, पहिली कार्यशाळा वर्धा येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्व विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी/एबीसी आयडी तयार करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रिया तसेच परीक्षा आवेदन व नामांकन करताना हा आयडी विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांना आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यासाठी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या निर्देशानुसार ही जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यासाठीची कार्यशाळा गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, वर्धा येथे होणार आहे. भंडारा जिल्ह्यासाठी शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीण भागातील महाविद्यालयांसाठी सोमवार, दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता नबीरा महाविद्यालय, काटोल येथे कार्यशाळा होणार आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी बुधवार, दिनांक २४ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता एन. एम. डी. महाविद्यालय, गोंदिया येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळांमध्ये अपार आयडी/एबीसी आयडी तयार करण्याची प्रक्रिया तसेच ‘स्त्रीशक्ती (स्वयंसिद्ध) पोर्टल’विषयी उपयुक्त माहिती विद्यापीठाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येणार आहे. ठरविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी सर्व महाविद्यालयांनी या कार्यशाळेस प्रतिनिधी पाठवावेत, असे आवाहन केले आहे.