नागपूर,
Shivaji Shikshan Sanstha, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या वतीने आयोजित विभागीय क्रीडा महोत्सव २०२५ चा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोराडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त नागपूर, चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हा प्रभागस्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे कल्याण अधिकारी मयूर मेंढेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. क्रीडेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असे मत व्यक्त करत भविष्यातही संस्थेला सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष, नगरपंचायत महादुला राजेश रंगारी होते.

आपण या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून या शाळेने आपल्या व्यक्तिमत्त्व घडणीत मोलाचा वाटा उचलल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंतराव वाय. काळमेघ यांनी विद्यार्थीदशेत क्रीडेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व आपल्या प्रभावी भाषणातून अधोरेखित केले. विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांत सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने क्रीडा शिष्यवृत्ती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी फुटबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यामंदिर हायस्कूल, कोराडीच्या इयत्ता ९ वीची शर्वरी प्रकाश फाले हिचा पालकांसह विशेष सत्कार करण्यात आला. दोन दिवसीय या क्रीडा महोत्सवात नागपूर विभागातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या ११ शाळांतील सुमारे २५० खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक सहभागी झाले आहेत. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शैलेश भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून या आयोजनाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.