नवी दिल्ली,
News about the reservation chart रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता तिकिटांची वेटिंग लिस्ट किंवा आरएसी स्थिती आधीपेक्षा खूप लवकर समजणार आहे. पहिल्यांदाच रेल्वे बोर्डाने आरक्षण चार्ट तयार करण्याच्या वेळेत बदल केला असून, यामुळे प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या तब्बल १० तास आधी त्यांच्या तिकिटाची स्थिती कळू शकणार आहे. नवीन नियमानुसार सकाळी ५ ते दुपारी २ वाजेदरम्यान सुटणाऱ्या गाड्यांसाठी पहिला आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत तयार केला जाईल. तर दुपारी २.०१ ते रात्री ११.५९ आणि मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या गाड्यांसाठीचा चार्ट ट्रेन सुटण्याच्या १० तास आधी तयार केला जाईल. यापूर्वी हा चार्ट फक्त चार तास आधी बनवला जात होता.

जुन्या पद्धतीमुळे वेटिंग लिस्ट किंवा आरएसीमध्ये असलेल्या प्रवाशांना शेवटच्या क्षणापर्यंत तिकिट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती मिळत नव्हती. अनेक प्रवासी दूरवरून स्टेशनवर पोहोचायचे आणि नंतर तिकिट कन्फर्म नसल्याचे समजायचे. यामुळे वेळ, पैसा आणि मानसिक तणाव वाढत होता. विशेषतः परदेशातून किंवा दुर्गम भागांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सोपे व्हावे आणि अनावश्यक गैरसोय टळावी, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. चार्ट लवकर तयार झाल्यामुळे प्रवाशांना आगाऊ निर्णय घेता येईल आणि प्रवासाबाबत स्पष्टता मिळेल. दीर्घकाळापासून येणाऱ्या तक्रारींचा विचार करून रेल्वेने हा निर्णय घेतला असून, यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.