ढाका,
Terrorist camps are active in Bangladesh बांग्लादेशात पाकिस्तान समर्थित दहशतवादी कॅम्प्सच्या वाढत्या सक्रियतेमुळे भारताच्या सुरक्षेस मोठा धोका निर्माण झाला आहे. शेख हसीना सत्तेतून बाहेर गेल्यानंतर बांग्लादेशमध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप वाढला असून, अनेक भारतविरोधी निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. गोपनीय अहवालांनुसार, बांग्लादेशच्या विविध भागात पाकिस्तान आणि जमान-ए-इस्लामीच्या मदतीने आठ दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प सुरू आहेत. त्यापैकी तीन कॅम्प भारतीय सीमेच्या जवळ आहेत. या टेरर कॅम्प्सचा मुख्य उद्देश भारताला नुकसान पोहोचवणे असून, त्यांमुळे सर्जिकल किंवा एअर स्ट्राइकसारखी त्वरित कारवाई आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. चिट्टागोंगच्या लालखान भागातील एक कॅम्प अंसार अल-इस्लाम आणि लश्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. हा कॅम्प हारुन इजहार आणि पाकिस्तानी सैन्याचा माजी मेजर जियाच्या मार्गदर्शनाखाली चालवला जातो आणि भारताच्या त्रिपुरा व मिजोरम सीमेजवळ स्थित आहे.
बसिला आणि मोहम्मदपूर मधील मदरशांमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत, परंतु या कॅम्प्स कोण चालवत आहेत याची माहिती अद्याप स्पष्ट नाही. ढाकामधील तामीर-उल-मिल्लत मदरशामध्ये इस्लामी विद्यार्थी संघटना आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI ची जबाबदारी असल्याचे समजते. चिट्टागोंग हिल ट्रॅक्ट्समध्ये जमातुल अंसार फिल हिंदालचा कॅम्प चालू आहे, ज्याला शमीन महफुजसारख्या कट्टरपंथी संघटनांचा पाठिंबा आहे. या संघटनेचा केएनएफ आणि अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीशी (ARSA) संबंध असून, हा भाग त्रिपुरा आणि म्यानमार बॉर्डरजवळ आहे.
त्याचबरोबर, नदी किनाऱ्यावर आणखी चार ठिकाणी जमात-उल-मुजाहिदीनचे तळ असून, बोगरा व चपाइनवाबगंज क्षेत्रात पश्चिम बंगालशी लागून असलेल्या बेल्टमध्ये हे कार्यरत आहेत. ढाकामध्ये हिज्ब-उत-तहरीर कट्टरपंथी विचारधारा पसरवत आहेत. दक्षिण आशियाच्या सुरक्षेसाठी ही स्थिती गंभीर धोकादायक ठरत आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मुलाने सजीब वाजेद जॉयनेही या दहशतवादी कॅम्प्सबाबत चिंता व्यक्त केली असून, बांग्लादेशात कट्टरपंथीय शक्तींना मोकळीक मिळाल्यामुळे पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्क हातपाय पसरवत असल्याचे सांगितले आहे.