ठेकेदारांचे कोटींची देयक थांबली; कामं लांबणीवर

17 Dec 2025 19:23:58
वर्धा, 
contractors-payments : राज्यभर विविध विभागांच्या ठेकेदारांचे देयक थकीत आहेत. तर काही महिन्यांपासून जिल्ह्यातील छोटे-मोठे ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत केलेल्या कामांच्या देयकांसाठी संघर्ष करत आहेत. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे ठेकेदारांचे सुमारे ३२ कोटी रुपयांचे देयक थकले आहे. देयकच थकल्याने काही ठेकेदारांनी कामे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिपच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ठेकेदारांना नोटीस पाठवून वेळेवर काम पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने त्यांच्याही अडचणीत चांगलीच भर पडली आहे.
 
 
JKL
 
वर्धा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा ठेकेदार संघटनांनी थकीत देयकांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यंतरी तीव्र आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर काही टप्प्यांमध्ये जिल्ह्याला निधी प्राप्त झाला. ज्याचे वितरण ठेकेदारांना करण्यात आले. तरीही सध्या कोट्यवधीचे देयक थकीत आहेत. तीन दिवसांपूर्वी ठेकेदार सुधीर बनसोड यांचे निधन झाले. आर्थिक तणावामुळेच त्यांचा मृत्यू झालाचा आरोप ठेकेदारांनी केला आहे. त्यांचे जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांचे २८ लाख ७६ हजारांचे देयक दोन वर्षांपासून थकले होते.
 
 
 
केंद्र सरकारकडून केलेल्या कामांसाठी निधी अजूनपर्यंत प्राप्त झाला नाही. यामुळे काही ठेकेदारांनी काम थांबवले आहेत. काम थांबविलेल्या ठेकेदारांना नोटीस पाठवली जात आहे. राज्य सरकारकडून प्राप्त निधीचे वितरण ठेकेदारांना करण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकारकडून निधी केव्हा प्राप्त होईल, शिवाय तो ठेकेदारांना केव्हा मिळेल याबाबत अनिश्चितता कायम आहे.
 
 
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत चालू असलेल्या अशा कामांमध्ये ठेकेदारांची प्रगती कमी दिसत असल्यास त्यांना नोटीस दिली जात आहे. ही एक नियमित प्रक्रिया आहे. वेळेवर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. वरिष्ठ स्तरावर निधी प्राप्त होताच त्याचे वितरण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जिपच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता धीरज परांडे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0