bubulcus ibis डोंगर उतारावर पांढरे शुभ्र पक्षी काहीतरी टिपत फिरत असताना अनेकदा नजरेस पडतात. साधारणपणे ५१ सेंमीचे हे पक्षी म्हणजे गायबगळे! हे त्यांच्या लांब ढांगा टाकत चालण्याच्या शैलीवरून सहज ओळखता येतात. गायबगळा हा पांढऱ्या रंगाचा असून त्याची चोच पिवळ्या रंगाची असते. कुरणांच्या आजूबाजूला ते विशेषत्वाने दिसून येतात. इतकंच काय, शेतात जेव्हा नांगरणी चालू असते, तेव्हा नांगराच्या मागे चालत जाऊन जमिनीत आढळून येणारे किडे गायबगळा खातो. म्हणूनच त्याला शेतकऱ्याचा मित्र असेही म्हणतात. सायंकाळच्या वेळी यांचे थवे नदीच्या काठावर दिसून येतात. त्याला ढोरबगळा असेही म्हटले जाते.
मध्यम आकाराचा गायबगळा गुरांच्या सान्निध्यात राहून त्याच्या हालचालीमुळे उडणारे छोटे कीटक गट्टम करतो. विणीच्या हंगामात मादी गायबगळ्याच्या शरीराचा रंग पिवळसर होतो. चोच, पाय आणि मानेवर पिवळ्या रंगाची पिसे येतात.चोच मात्र लांब असते, जी भक्ष्य पकडण्यासाठी त्यांना फायदेशीर ठरते. गायबगळ्याचे काळे कुळकुळीत पाय लांब असतात. भारतासोबतच श्रीलंका आणि आशिया व युरोपमधील उष्ण प्रदेशात हा पक्षी आढळून येतो. या प्रदेशातील गायरानात किंवा कुरणांमध्ये अधिक प्रमाणात यांचा वावर असतो. मासे आणि कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य असून, गुरांच्या आसपास फिरत राहतात. गायबगळ्याची शरीरयष्टी सडपातळ असून त्यात चपळता असते. नर आणि मादी दोघेही दिसायला सारखेच असतात. विणीचा हंगाम आटोपला की, मादीवर आलेली पिवळी पिसे आपोआप गळून पडतात. सरडे, बेडूकही ते आवडीने खातात.bubulcus ibis पावसाळा सुरू झाला की, गायबगळे आपली घरटी तयार करतात. त्यासाठी, योग्य जागेचा शोध घेण्यासाठी दूरपर्यंत प्रवास करतात. अखेर आंबा, जांभूळ अशा झाडांवर घरटी बांधून तेथे विणीचा हंगाम पूर्ण करतात.