'इतना घमंड सही नहीं'... काय केले विराट अनुष्काने असे? Video

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Virat Kohli Anushka Sharma बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यानंतर या सेलिब्रिटी दाम्पत्यावर टीकेची झोड उठली आहे. प्रेमानंद जी महाराज यांच्या आश्रमातील दर्शनानंतर मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या विराट आणि अनुष्काच्या वागणुकीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
 

Virat Kohli Anushka Sharma  
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कडक सुरक्षाव्यवस्थेत गर्दीने भरलेल्या विमानतळ टर्मिनलमधून जाताना दिसत आहेत. या दरम्यान, एक व्यक्ती त्यांच्याकडे सेल्फी घेण्याची विनंती करताना दिसतो. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी हा व्यक्ती दिव्यांग असल्याचा दावा केला आहे. मात्र, गोंधळ, कॅमेऱ्यांचा फ्लॅश आणि सुरक्षारक्षकांच्या धावपळीत हे दाम्पत्य त्या व्यक्तीसोबत थांबले नाही आणि थेट आपल्या गाडीच्या दिशेने पुढे गेले.या घटनेदरम्यान, सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला बाजूला हटवले, तर विराट आणि अनुष्का कोणतीही प्रतिक्रिया न देता गाडीत बसून निघून गेले. याच दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून अनेकांनी या जोडीवर असंवेदनशीलतेचे आरोप केले आहेत.
 
 
 
                                                                        सौजन्य : सोशल मीडिया 
                                                         
 
विशेषतः ही विनंती एका दिव्यांग व्यक्तीकडून आली असल्याचे सांगितले जात असल्याने, अनेक युजर्सनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर काहींनी या वागणुकीला “वाईट आणि निराशाजनक” असे म्हटले, तर काहींनी “घमेंड योग्य नाही” अशा शब्दांत टीका केली. काही युजर्सनी तर “अशा लोकांचे चाहते का बनतात?” असा सवालही उपस्थित केला आहे.दरम्यान, प्रेमानंद जी महाराजांच्या आश्रमातील दर्शनानंतर असे वर्तन शोभत नसल्याची प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर विराट कोहली किंवा अनुष्का शर्मा यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.सोशल मीडियाच्या युगात सेलिब्रिटींच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहिले जाते आणि अशा घटनांमुळे त्यांची प्रतिमा कशी प्रभावित होते, याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे.