अमरावतीत एकमेकांच्या प्रतीक्षेत

17 Dec 2025 10:21:16
 
वेध
 
 
गिरीश शेरेकर
amravati election मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रिद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि या तिघांच्याही पक्षातील प्रमुख नेते महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढणार हे वारंवार सांगत असले तरी प्रत्यक्षात स्थिती महापालिकानिहाय खूपच वेगवेगळी आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे यांची स्थिती महायुतीपेक्षा वेगळी नाही. अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा विचार केला तर महायुती व महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढेल असे अजिबात वाटत नाही. मागच्याही निवडणुका ते एकत्र लढले नव्हते. मुंबई फक्त अपवाद होती. दोन्ही बाजूने अद्याप पत्ते उघड झालेले नाही. ते एकमेकांच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच पक्ष स्वतंत्र लढतील आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करतील, अशी शक्यता जास्त आहे. कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी ते जास्त सोयीचे ठरेल, असा विचारप्रवाह जवळपास सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती व आघाडीत लढवाव्या असे वाटत नाही. युती व आघाडीचे समीकरण निकालानंतर जुळवावे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे.
 
 
निवडणुका
 
 
 
महायुतीतल्या घटक पक्षांची अमरावतीतली स्थिती तर एकमेकात संवाद होईल, इतकी पण सुस्थितीत नाही. भाजपाने मागच्या निवडणुकीत 87 पैकी 76 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 45 जागा जिंकल्या होत्या आणि त्यांचे 10 उमेदवार दुसèयास्थानी होते. आता तर भाजपाची स्थिती त्यापेक्षाही चांगली आहे. अशा चलतीच्या काळात भाजपा आपल्या हक्काच्या जागा मित्रपक्षाला देऊन निवडणूक लढेल असे वाटत नाही. भाजपा नेते व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच अमरावतीत महायुती म्हणून निवडणूक लढणार पण महापौर भाजपाचाच होईल, अशी घोषणा केली. याचाच अर्थ त्यांना महायुतीचा फक्त जप करायचा आहे आणि युती करायचीच वेळ आली तर ती भाजपाच्याच फार्मुल्याने होईल. त्यात किमान 65 जागा भाजपा लढेल, असे दिसते. विशेष म्हणजे भाजपा युतीसाठी पुढाकार घेईल, असे वाटत नाही. भाजपाच्या या भूमिकेची जाणीव राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना पण झाली आहे. भाजपासोबत फरफटत जाण्यात काही फायदा नाही. यश मिळाले नाही तरी चालेल पण स्वतंत्रपणे निवडणूक लढवून पक्षाचा विस्तार करत संघटन वाढवायचे, अशी भावना स्थानिक नेत्यांची व कार्यकर्त्यांची आहे. त्याच धोरणानुसार ते कामाला लागले आहे. त्यामुळेच महायुती घटक पक्षांमध्ये संवाद होण्याचे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नसले तरी ते एकमेकांच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतले वातावरण फार काही वेगळे नाही. काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी दुभंगल्यामुळे उबाठा आाणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कमजोर आहे. काँग्रेसला संघटन मजबूत करायचे असल्याने मित्रपक्षांना फार जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. वरिष्ठांनी काही निर्णय घेतला तरच विचारविनिमय होईल. पण, असा काही निर्णय होण्याची शक्यता हळूहळू मावळत आहे. मनसेचा आघाडीत समावेश होतो की नाही, हे सुद्धा स्पष्ट नाही. आघाडीतला कोणताच पक्ष एकमेकांवर अवलंबून नसला तरी प्रतीक्षेत आहे. आपली तयारी त्यांनी जोरात सुरू केली आहे. जशी वेळ येईल, तशी निवडणूक लढण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. आघाडीपेक्षा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्यावर काँग्रेसचा जोर राहील असे दिसते.
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला आहे. या निवडणुका जवळपास सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्याचे निकाल कसे येतात यावरही युती व आघाडीचे महापालिकेचे गणित आहे. कारण, या निकालांचा प्रभाव या निवडणुकांवर निश्चितपणे पडणार आहे. भाजपा, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार यांना या निकालात चांगले यश मिळाले तर युती होणार नाही. समजा या पक्षांना फटका बसला तर प्रमुख ठिकाणी ते युती करतील.amravati election रविवारच्या मतमोजणीनंतर आघाडीतल्या घटक पक्षांत अधिक स्पष्टता येईल. काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या तर त्यांचे मनोबल वाढेल. आघाडी करण्याच्या फंदात ते पडणार नाहीत. मैत्रीपूर्ण लढतीचे गाजर ते घटक पक्षांना देऊन गुंतवून ठेवेल. निवडणूक न लढवता पस्तावण्यापेक्षा, निवडणूक लढवून पस्तावणे केव्हाही चांगले, अशी मानसिकता स्थानिकस्तरावर पदाधिकाèयांची आहे. त्याचा सन्मान होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. निर्णयाची प्रतीक्षा करू या!
 
9420721225
Powered By Sangraha 9.0