कारंजा लाड,
Bambarda farmers denied compensation तालुयातील बांबर्डा (कानकिरड) येथील तब्बल ३५ शेतकरी २०२५ खरीप हंगामातील अतिवृष्टी पिक नुकसान भरपाई व रब्बी बियाणे अनुदानापासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत शेतकर्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे.
जुलै-ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यानंतर सप्टेंबर-ऑटोबर २०२५ मध्ये तलाठ्यांकडून पंचनामा करण्यात आला होता.दरम्यान, शासनाने ७ ऑटोबर २०२५ रोजी अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांसाठी २३१ व ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच १७ ऑटोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार प्रति हेटर ८५०० रुपये प्रति हेटर नुकसान भरपाई व रब्बी बियाणे अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, १७ डिसेंबर २०२५ पर्यंत संबंधित शेतकर्यांना एक रुपयाही मदत मिळालेली नाही, तसेच रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणेही उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. तलाठी स्तरावर विशिष्ट व्ही.के.क्रमांक तयार करण्यात आलेला नाही. याबाबत विचारणा केल्यावर पैसे येत आहेत असे सांगून शेतकर्यांची दिशाभूल केली जात आहे.
व्ही.के. क्रमांक नसल्याने ई केवायसी व डीबीटी प्रक्रिया थांबली असून, शेतकरी थेट मदतीपासून वंचित राहिले आहेत. रब्बी पेरणीचा हंगाम सुरू असताना बियाणे व खत खरेदीसाठी आर्थिक अडचण निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम शेतीवर होत असल्याचे तक्रारीत शेतकर्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे तलाठ्यांकडून तात्काळ चौकशी करून व्ही. के क्रमांक तयार करावेत,लाभार्थी यादीत नावे समाविष्ट करून नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा करावी,रब्बी बियाणे अनुदान किंवा मोफत बियाणे त्वरित वितरित करावे अशी मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी वाशीम यांना तात्काळ कार्यवाहीसाठी तसेच राज्याचे महसूल मंत्री यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. शासनाने जाहीर केलेली मदत प्रत्यक्षात शेतकर्यांपर्यंत पोहोचत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तक्रारीवर देवमण कोहरे, इंदिराबाई कानकिरड, बबन कानकिरड, मोरेश्वर वानखडे, मनोहर कानकीरड, आशिष कानकीरड यांच्यासह इतर शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.