नागपूर,
dhurandhar-movie-memes : हेरगिरीवर आधारित बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर’ प्रदर्शित झाल्यापासून देशभरात चर्चेत असून, त्या चित्रपटातील एंट्री सॉंग आणि त्यामधील काही दृष्यांवर अनेक मिम्स बनत आहे. सध्या ते व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून तो ट्रेंड नागपुरातही जोरदारपणे दिसत आहे. भारत–पाकिस्तान या दोन देशातील हेरगिरीवर आधारित असलेल्याया धुरंधर चित्रपटाच्या कथानकामुळे काही वाद झाले असले, तरी सोशल मीडियावर उफाळलेला “पाकिस्तानातील हेर म्हणून पहिला दिवस” हा एक विनोदी मीम ट्रेंड नागपूरकरांनाही भुरळ घालत आहे.

इंस्टाग्रामवरील रील्समध्ये नागपूरसह विदर्भातील तरुण कंटेंट क्रिएटर्स या कॅप्शनखाली भन्नाट व्हिडिओ शेअर करत असून, हे व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहेत. या ट्रेंडची गंमत अशी की, रील्समधील ‘हेर’ स्वतःच्या दैनंदिन सवयींमुळेच ओळख उघड करतो. भारतीय, विशेषतः हिंदू सांस्कृतिक चालीरिती नकळत दिसल्याने पात्र पकडले जाते आणि हाच या मीम्सचा पंच ठरतो. कुठे भिंतीवरील माकडाच्या पोस्टरला नमस्कार करणारा ‘हेर’, तर कुठे आदरार्थ पाय स्पर्श करणारा एजंट; तर काही रील्समध्ये चहाच्या टपरीवर क्यूआर कोड मागणे किंवा बोलताना ठळक दिसून पडणारा नागपुरी भाषेचा लहजा अशा छोट्या प्रसंगांतून प्रेक्षकांना खळखळून हसवले जात आहे. बहुतांश व्हिडिओंमध्ये पार्श्वसंगीत म्हणून ‘कारवां’ गाणे वापरल्याने या ट्रेंडला ठरावीक फॉरमॅट मिळाला आहे. पडद्यावर हेरगिरीचा थरार असताना, नागपुरातील डिजिटल विश्वात मात्र हास्याचा जल्लोष सुरू आहे. ‘धुरंधर’ने सिनेमागृहांसोबतच सोशल मीडियावरही आपली ठसठशीत छाप उमटवली आहे.