प्रशासनात गतिमानता व समन्वयावर भर द्यावा : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

18 Dec 2025 18:08:47
वाशीम,
Divisional Commissioner Dr Shweta Singhal शासनाच्या प्रत्येक योजना व निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सर्व विभागांनी वेळेचे काटेकोर पालन, पारदर्शकता व परस्पर समन्वय राखून काम करावे. प्रलंबित प्रकरणे कमी करणे, तक्रारींचा तातडीने निपटारा करणे आणि गुणवत्तापूर्ण विकासकामांवर भर देणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने व संवेदनशीलतेने कार्य करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले.
 

Divisional Commissioner Dr Shweta Singhal 
जिल्ह्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची सविस्तर आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात येऊन शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि प्रशासनातील समन्वय बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला.
 
 
 
 
बैठकीस जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, सहाय्यक परिविक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येक विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील चालू योजनांची प्रगती, अडचणी तसेच पुढील कालावधीतील नियोजनाची माहिती सादर केली.विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आढावा घेताना शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत वेळेत व प्रभावीपणे पोहोचविण्याचे निर्देश दिले. कामकाजात पारदर्शकता, वेळेचे काटेकोर पालन आणि विभागांमधील समन्वय वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करून सेवा वितरणात गती आणण्यावर त्यांनी भर दिला.
 
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले , शासनाच्या सर्व योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. नागरिककेंद्रित सेवा वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असून, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यावर भर देण्यात येत आहे. विकासकामे ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. बैठकीला विविध विभागांच्या प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0