बिबट्याच्या हल्ल्यात बांबू कटाई मजुराचा मृत्यू

18 Dec 2025 18:20:08
चंद्रपूर,
leopard attack Chandrapur, मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर बिटात बिबट्याच्या हल्ल्यात बांबू कटाईचे काम करणार्‍या एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडली. साहजू चमरू बिलठेरिया (63, रा. प्रतला, ता. मंडला, मध्यप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे.
 

leopard attack Chandrapur 
साहजू बिलठेरिया हा गुरूवारी सकाळच्या सुमारास अडेगाव गावालगत कक्ष क्रमांक 181 मध्ये बांबू कटाईचे काम करीत होते. यवेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. सहकार्‍यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जंगलात पसार झाला. घटनेची माहिती कळताच मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपापयोजना सुरू केल्या. दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप एकाडे व त्यांचे पथकही घटनास्थळी पोहचले. वनाधिकारी व कर्मचार्‍यांच्या उपस्थित पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतकाच्या नातेवाईकांना वनविभागाच्या वतीने 50 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.
दरम्यान, बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी या परिसरात कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आले आहे. या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0