तभा वृत्तसेवा
पुसद,
illegal-tree-felling : मच्छिंद्र बोरी मार्गावर अवैध वृक्षतोडीचा प्रकार सध्या प्रचंड प्रमाणात सुरू असून, यामुळे वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ही वृक्षतोड वनविभागाच्या कार्यालयापासून फक्त 3 किमी अंतरावर असलेल्या मच्छिंद्रबोरी गावाच्या अलीकडे, भर रस्त्यावर राजरोसपणे सुरू आहे.
गत तीन दिवसांपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेली, वर्षानुवर्षे नागरिकांनी जपलेली आणि 80 ते 100 वर्षांहून अधिक वयाची मोठमोठी लिंबाची तसेच इतर वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप वृक्षप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे’ ही महाराष्ट्राची परंपरा असताना, शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये वृक्षलागवडीसाठी खर्च करत आहे. मात्र, दुसरीकडे 100 वर्षांचे वृक्ष कोणाच्या आशीर्वादाने तोडले जात आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
ही वृक्षतोड प्रशासनाच्या मूकसंमतीने सुरू आहे का, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची भीती व्यक्त होत असून, तत्काळ कठोर कारवाई न झाल्यास वनविभागाला मोठ्या जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, अवैध वृक्षतोड तत्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.