वाशीम,
Yogesh Kumbhejakar, अल्पसंख्याक समाजाला संविधानाने दिलेले हक्क सुरक्षित ठेवणे व त्या हक्कांवर आधारित सर्वांगीण विकास घडवून आणणे ही शासनाची प्रमुख जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार व सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्ये अल्पसंख्याक घटकांना समान संधी मिळावी यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न करत आहे. शासन, प्रशासन व समाज यांच्यात समन्वय साधूनच अल्पसंख्याक समाजाचा शाश्वत व सर्वसमावेशक विकास साधता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, गृह विभागाचे पोलिस उपअधीक्षक धर्मा सोनवणे, सहाय्यक नियोजन अधिकारी संजय राठोड, महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक कविता कांबळे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारी यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमातून अल्पसंख्याक समाजाच्या घटनात्मक हक्कांची जाणीव करून देत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असा संदेश देण्यात आला. विविध विभागांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील योजनांची माहिती देत लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांनी अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी संविधानाने दिलेल्या समानता, स्वातंत्र्य व न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासनस्तरावर राबविण्यात येणार्या विविध योजनांची रूपरेषाही त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांनी मानले. अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांविषयी जागरूकता वाढविणारा व शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाला अल्पसंख्याक समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्प देऊन करण्यात आले.