नागपूर,
nagpur-news : महानगरपालिकेतील कला शिक्षकांनी विविध माध्यमांचा कल्पकतेने वापर करत साकारलेल्या अमूर्त शैलीतील चित्रांचे भव्य प्रदर्शन संत जगनाडे चौकातील कलादालनात भरविण्यात आले आहे. निसर्ग, संस्कृती व परंपरा या विषयांच्या विविध छटा या प्रदर्शनातून प्रभावीपणे उलगडण्यात आल्या आहेत. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शेखर सावरबांधे, स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत खोब्रागडे, डॉ. राम कोल्हे, रवी खंडाईत, प्रदीप वाढीभस्मे यांच्यासह अनेक कलाप्रेमी उपस्थित होते. संत जगनाडे महाराज यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या गॅलरीमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात विविध कलाकारांनी निसर्ग आणि मानवी जीवनाचे भावस्पर्शी दर्शन घडवले आहे. श्रीकांत गडकरी यांनी नाचनाणा नंदी, पूजा करणारी स्त्री व सोंगट्या खेळणारी मुलगी साकारली आहे. किशोर सोनटक्के, राजकुमार कावळे, सुभाष राठोड यांसारख्या कलाकारांनी आपल्या मंत्रमुग्ध करणारी चित्रे सादर केली आहेत. पारदर्शक रंगांत निसर्ग सौंदर्य साकारणारी प्रकाश जिल्हारे, हरीष ढोबळे व अतुल पारधी यांची चित्रे लक्ष वेधून घेतात. कोलाज माध्यमातून फुले, पाने व फुलदाण्यांची प्रकाशासह मांडणी नीता गडेकर यांनी केली आहे. कल्पना गुलालकरी यांनी भारतीय चित्रशैलीचा प्रभावी वापर केला असून, कमल घोडमारे यांनी टाकावू कापडातून कलाकृती साकारल्या आहेत. पेन्सिलच्या साहाय्याने व्यक्तीचित्रे रेखाटणाऱ्या प्रगती सरोदे यांच्या कलाकृतीही विशेष ठरल्या आहेत. हे चित्रप्रदर्शन २० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याची माहिती संयोजक श्रीकांत गडकरी यांनी दिली आहे.