नागपूर,
nagpur-news : विजेचा अनधिकृत वापर करणे एका महिलेला महागात पडले आहे. नागपूरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने याप्रकरणी संबंधित महिलेला दोषी ठरवत १० हजारांचा दंड आणि ’न्यायालय सुटेपर्यंत’ कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महिनाभरात सलग दुस-यांदा विजेचा अनधिकृत वापर करणा-या ग्राहकाला अशाप्रकारची सुनावली आहे.
तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या भानखेडा, येथे राहणार्या ग्राहकाच्या घरी २७ सप्टेंबर २०२१ रोजी महावितरणच्या पथकाने छापा टाकला होता. महावितरणचे सहाय्यक अभियंता शाहरुख मेहमूद्दीन तुराक यांनी केलेल्या तपासणीत असे आढळले की, आरोपी महिलेने वीज खांबावरून अनधिकृतपणे वीज जोडणी घेतली होती. वीज वापरासाठी विजेची चोरी आणि मीटरमध्ये फेरफार ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा, २००३ च्या कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात गुन्हा कबूल
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान आरोपी महिलेने स्वतःहून आपला गुन्हा कबूल केला. आपण घरातील कमावती व्यक्ती असून उदरनिर्वाहासाठी छोटा घरगुती व्यवसाय चालवत सांगत तिने न्यायालयाकडे दयेची मागणी केली होती. न्यायाधीशांनी आरोपीची परिस्थिती आणि तिने प्रथमच केलेला गुन्हा लक्षात घेता, तिला कारावासाऐवजी दंडात्मक शिक्षा देणे योग्य मानले. यानुसार न्यायालयाने न्यायालय सुटेपर्यंत कोठडीत बसण्याची शिक्षा. महावितरणला नुकसान भरपाई म्हणून देण्यासाठी १० हजार रुपये दंड आणि भविष्यात गुन्ह्याची पुनरावृत्ती न करण्याची ताकीद दिली आहे.
खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. काझी यांनी बाजू मांडली. अनधिकृत वीज वापर हा गंभीर गुन्हा असला तरी, आरोपीने तपासात सहकार्य केल्याने न्यायालयाने तिला दंड भरण्याची संधी देऊन प्रकरणाचा निकाल लावला.
न्यायालयाचा महिनाभरात दुसरा शॉक
तीन आठवड्यापुर्वी जिल्हा न्यायाधीश-३ आणि सत्र न्यायाधीश श्री एस. एच. ग्वालानी यांनी विशेष प्रकरणामध्ये अनधिकृत वीज ग्राहकाला दोषी ठरवून ’न्यायालयीन कामकाजाच्या समाप्तीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता.
वीज बिल थकीत असल्यामुळे महावितरणने ग्राहकाची वीज जोडणी नियमानुसार खंडित केली होती. मात्र, वीज बिल न भरता आणि कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आरोपी ग्राहकाने हे खंडित केलेली वीज जोडणी पुन्हा अवैधपणे जोडून वीज वापरण्यास केली. ही बाब महावितरणच्या निदर्शनास येताच, कंपनीने तात्काळ कारवाई करत २०२१ साली मध्ये नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये संबंधित ग्राहकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना, जिल्हा न्यायाधीश-३ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयाने शमशेरा बेगम शेख बब्बू यांना दोषी ठरवले. कोर्ट उठेपर्यंत तुरुंगवास तसेच १०हजाराचा शिक्षा सुनावली होती.