मुंबई,
Ram Sutar death जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार, महाराष्ट्रभूषण पुरस्कारप्राप्त डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कला, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. देशातील अनेक मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात डॉ. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचे नमूद केले. त्यांनी सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त करत कुटुंबीयांना सांत्वन दिले. आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, रामभाऊंच्या निधनाने जिवंत मूर्ती साकारणारा जागतिक कीर्तीचा एक उमदा कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या शिल्पांमधील बारकाई, सौंदर्य आणि जिवंतपणा हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते.
मुख्यमंत्री फडणवीस Ram Sutar death यांनी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत डॉ. सुतार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान केल्याची आठवण करून दिली. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी ‘महाराष्ट्र माझा’ या गीताच्या ओळी उच्चारल्या, तो क्षण अत्यंत भावूक करणारा होता, असे त्यांनी म्हटले आहे.डॉ. राम सुतार यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत देशातील अनेक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या शिल्पांना आकार दिला. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा, अंदमानमधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, तसेच संसद भवन परिसरातील अनेक शिल्पे त्यांच्या कलेची साक्ष देतात. वयाच्या शंभराव्या वर्षातही ते मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामात सक्रिय होते.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच वारकरी संतांच्या शिल्पांमधून त्यांनी समाजाला प्रेरणा देणारी परंपरा जपली. त्यांच्या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके स्मरणात राहील आणि प्रत्येक शिल्प पाहताना डॉ. राम सुतार यांचेच स्मरण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.डॉ. राम सुतार यांच्या निधनाने देशाने एक महान शिल्पकार आणि संवेदनशील कलाकार गमावला असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण राज्य सहभागी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.