नागपूर,
sanjeevan-yoga-center : कान्होलीबारा रोडवरील देवळी येथील संजीवन निसर्गोपचार व योग केंद्रात 19 ते 21 डिसेंबर सामूहिक ध्यान, योगाभ्यास व प्राणायाम शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
आजच्या तणावपूर्ण व स्पर्धात्मक जीवनशैलीत माणूस शारीरिकदृष्ट्या सक्रिय दिसतो. परंतु मानसिकदृष्ट्या अत्यंत थकलेला असतो. अशावेळी ध्यान ही एक सोपी, नैसर्गिक व प्रभावी पद्धत आहे जी आपल्याला आंतरिक शांती, स्थिरता व उर्जेशी जोडते. हा उद्देश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिन साजरा केला जातो.
ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे, तर स्वतःच्या विचारांना समजून घेणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व चैतन्याच्या उच्च स्तरावर पोहोचणे ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. नियमित ध्यानाभ्यासामुळे तणाव, चिंता, नैराश्य व निद्रानाश यासारख्या समस्या कमी होतात. एकाग्रता, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढतो.
निसर्गोपचार व योग या दृष्टिकोनातून पाहिले तर ध्यान शरीराची स्व-उपचार जागृत करते. मन शांत होते तेव्हा शरीर आपोआप संतुलित अवस्थेत येऊ लागते. म्हणूनच योग, प्राणायाम व ध्यान हे संपूर्ण आरोग्याचा पाया मानले जातात.
ध्यान हे केवळ रोग बरे करण्याचे साधन नसून जीवनाला सकारात्मक दिशा देण्याची एक कला आहे. ध्यान आपल्याला वर्तमानात जगायला शिकवते, विचारांच्या अशुद्धता दूर करते व आत्म साक्षात्काराकडे नेते. 21 डिसेंबरच्या जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष ध्यान व योग कार्यक्रमासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.