कालव्यात तरुण वाहून गेला

18 Dec 2025 21:18:20
तिवसा, 
young-man-swept-away : तिवसा शहरातील आनंदवाडी परिसरात गुरुवारी सकाळी कालव्यात पाय घसरल्याने एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. त्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ओम अरविंद सहारे (वय २१, रा. शोभानगर, अमरावती) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
 
 
 
tiwasa
 
 
अरविंद सहारे हे वनविभागाच्या वॉल कंपाऊंड (तार कुंपण) कामाची पाहणी करण्यासाठी सुपरवायझर म्हणून तिवसा येथे आले होते. त्यांचा मुलगा ओम सोबत होता. सकाळी १० वाजता ते बांधकामस्थळी दाखल झाले. काम सुरू असताना ओम हा जवळच असलेल्या कालव्यात पाय धुण्यासाठी गेला. मात्र कालव्यात पाण्याचा प्रवाह अत्यंत जोरात असल्याने त्याचा पाय घसरला आणि तो क्षणात पाण्याच्या ओढीत वाहून गेला. ही घटना वडील अरविंद सहारे यांच्या डोळ्यादेखत घडली. वडिलांनी मदतीसाठी आरडाओरड करत धाव घेतली.
 
 
मात्र, तोपर्यंत ओम पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. घटनेची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांनी तत्काळ अप्पर वर्धा कालवा प्रशासनाशी संपर्क साधून कालव्यातील पाण्याचा प्रवाह थांबवण्याच्या सूचना दिल्या. अमरावती येथील डीडीआरएफ पथक तातडीने तिवसा येथे दाखल झाले. कालव्यात शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. सायंकाळपर्यंत ओमचा शोध सुरूच होता. या घटनेमुळे सहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0