उद्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पडताळणी

18 Dec 2025 19:35:23
वर्धा,
candidates-election-expenses : नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली होती. निवडणूक काळात अ श्रेणी नपच्या नगराध्यक्षासाठी १५ लाख तर नगरसेवक पदासाठी ५ लाख रुपये, ब श्रेणी नगराध्यक्षासाठी ११.२५ लाख तर नगरसेवकांसाठी ३.५० लाख आणि क श्रेणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षासाठी ७.५० लाख तर नगरसेवक पदासाठी २.५० लाखांची खर्च मर्यादा देण्यात आली होती. आता निवडणुकीदरम्यान, उमेदवारांनी केलेल्या खर्चाची पडताळणी उद्या १९ रोजी करण्यात येणार आहे.
 
 
 
election
 
 
 
स्थानिक नगरपालिकेच्या अध्यक्ष व ३८ सदस्य पदासाठी मतदान पार पडले आहे. तर वर्धा येथील प्रभाग ९ ‘ब’ व प्रभाग १९ ‘ब’ या दोन सदस्यपदासाठी २० रोजी मतदान होणार आहे. सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी ज्यांनी निवडणूक लढविली अशा उमेदवारांना त्यांचा निवडणूक खर्च सादर करण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी गणेश खताळे यांनी दिल्या होत्या.
 
 
उमेदवारांनी २ डिसेंबरपर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाची प्रथम पडताळणी केली जाणार आहे. वर्धा नगरपालिकेच्या प्रभाग ९ ब तसेच १९ ब वगळता अध्यक्ष व सदस्य पदासाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले. प्रभाग ९ ब तसेच १९ ब करिता २० रोजी मतदान होणार आहे. २१ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. उमेदवारांनी २ डिसेंबरपर्यंत केलेला निवडणुकीसाठीच्या खर्चाची पडताळणी १९ डिसेंबरपर्यंत तपासणी पथकाच्या माध्यमातून वर्धा नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात केली जाणार आहे.
 
 
 
वर्धा नगरपालिकेची निवडणूक लढलेल्या उमेदवारांनी २ डिसेंबरपर्यंत केलेल्या खर्चाची पडताळणी १९ डिसेंबरपर्यंत खर्च तपासणी पथकाकडून केली जाणार आहे. त्यानंतरच्या खर्चाची अंतिम पडताळणी करून निवडणूक आयोगाला माहिती पाठविली जाणार असल्याची माहिती खर्च तपासणी पथकाचे नोडल अधिकारी भय्यालाल बमनोटे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0