वर्धा जिल्ह्यात १० वर्षांत ४ लाख वाहनांची नोंदणी

18 Dec 2025 15:42:23
वर्धा,
Wardha district vehicle registration, संकुचित रस्त्यांवर वाढत असलेली वाहनांची संख्या हा चिंतेचा विषय बनत आहे. वर्धा शहरासह बाजारपेठेत गेल्यावर वाहन कुठे उभे करायचे, असा प्रश्न वाहनचालकास पडतो. या परिसरात पालिकेच्या मालकीच्या १२ फुट रुंदीच्या गल्ल्या व्यावसायिकांकडून अतिक्रमण करून गिळंकृत करण्यात आल्या आहे. हे अतिक्रमण हटविल्यास त्या गल्ल्यांमध्ये किमान दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था होऊ शकते. पण, त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, गत १० वर्षांत जिल्ह्यात तब्बल ४ लाख नवीन वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 

Wardha district vehicle registration, 
सध्याच्या परिस्थितीत, जिल्ह्यात वाहनांची संख्या पाहिली तर दरवर्षी १५ ते २० हजार नवीन वाहने रस्त्यावर धावत आहेत. ज्यांच्याकडे फत सायकल असायची त्यांच्याकडेही आज पेट्रोल व इलेट्रीकवर धावणारी दुचाकी वाहने आहेत. पूर्वी दुचाकी असलेल्या घरांपुढे आता कार व इतर वाहने उभी दिसतात. आज शिक्षणातही मोठी स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या ट्यूशन लासेससाठी मुलांना पालकांकडून ये-जा करण्यासाठी दुचाकीची व्यवस्था करून दिली जाते. आज मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या हातातही वाहनं दिसून येत आहे. त्यामुळे आजघडीला घरोघरी एक किंवा अधिक वाहने दिसून येत आहेत. गेल्या १० वर्षांत जिल्ह्यात सुमारे ४ लाख वाहनांची नोंदणी झाली आहे. वाढत्या वाहनांच्या तुलनेत शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्ते अरुंद पडत आहेत. इतकेच नव्हे तर प्रमुख ठिकाणी पार्किंगची समस्याही उद्भवत आहे. शिवाय बहुदा वाहन चालकांना वाहतूक कोंडीच्या समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे.

वर्षनिहाय वाढलेली वाहनांची संख्या
 
 
सन २०१५-१६ : २२४७५
सन २०१६-१७ : २३८९५
सन २०१७-१८ : २३५४०
सन २०१८-१९ : २०२९८
सन २०१९-२० : १७०२०
सन २०२०-२१ : १५१०२
सन २०२१-२२ : १५०४७
सन २०२२-२३ : १७७३७
सन २०२३-२४ : १९४५२
सन २०२४-२५ : २१३८९
Powered By Sangraha 9.0