वरूडचा चंदन हरले भारतीय सैन्यात लेफ्टनंट

18 Dec 2025 21:12:51
वरूड, 
chandan-harle : येथील रहिवासी चंदन पुंडलिक हरले याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर नियुक्ती करण्यात झाली आहे. तालुक्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 

amt 
 
सामान्य कुटुंबातून आलेल्या चंदनच्या या यशामागे अथक परिश्रम, जिद्द आणि देशसेवेचे स्वप्न दडलेले आहे. चंदन हरले यांच्या आईचे नाव पुष्पा हरले, बहीण अश्विनी ही सॉफ्टवेअर इंजिनियर असून ती हैदराबाद येथे अ‍ॅमेझॉन कंपनीमध्ये कार्यरत आहे. चंदनने इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण घेत असताना सन २०१९-२० मध्ये कोल्हापूर येथे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस केले. त्यानंतर त्याने नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा दिली. या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि पुढे बंगळुरू येथे सेवा निवड मंडळाची मुलाखत दिली. या कठीण मुलाखतीतही यश प्राप्त केले. त्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत चंदनची निवड झाली.
 
 
देशभरातील हजारो उमेदवारांमधून केवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली आणि अधिकृतपणे एनडीएत प्रवेश केला. चंदनने फेब्रुवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत खडकवासला, पुणे येथे एनडीएचे कठोर व शिस्तबद्ध प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर त्याने इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे एका वर्षाचे पुढील प्रशिक्षण घेतले. १३ डिसेंबर रोजी चंदन आयएमएमधून पास आऊट झाले आणि अधिकृतपणे भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाले. त्यांची पहिली पोस्टिंग पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे झाली. चंदन हरले म्हणाले, देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून मी सातत्याने मेहनत घेतली. कुटुंबाचा पाठिंबा, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वासामुळे यश मिळू शकले. चंदनच्या या उल्लेखनीय यशामुळे वरूड तालुक्यात आनंदाचे वातावरण असून युवकांसाठी त्यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0