जनमत, विकास की पैसा ठरेल निर्णायक ?

18 Dec 2025 20:03:23
विजय आडे
उमरखेड, 
yavatmal-news : नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला पार पडली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे मतमोजणी 21 डिसेंबरला ढकलली गेली. आता अवघे तीन दिवस उरले असताना शहरात राजकीय वातावरण तापले आहे. खुल्या प्रवर्गातील महिला नप अध्यक्षपद व 13 प्रभागातील 26 नगरसेवकांच्या रिंगणात आणि जागांसाठी उतरलेल्या उमेदवारांत धडकी भरली आहे. जनतेत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जनमताचा कौल कोणाच्या बाजूने. चारित्र्य, कामगिरी अथवा विकासासाठी की पैशाची ताकद असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत.
 
 
k
 
उमरखेड येथे 66.51 टक्के मतदान झाले. न्यायालयाच्या निर्णयामुळे 18 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मतमोजणी होत असल्याने उमेदवारांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या कालावधीत अनेक उमेदवारांनी व राजकीय तज्ज्ञांनी आपआपली गणिते मांडली. काहींनी अनौपचारिक एक्झिट पोल करून विजयाचा दावा केला आहे, तर काहींनी सोशल मिडियावर आधीच गुलाल उधळण्याच्या पोस्ट केल्या आहेत.
 
 
मागील काही वर्षात प्रशासकीय राज असल्याने उमरखेडमध्ये विकासकामांचा वेग काहीसा मंदावला असल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील यशाचा फायदा मिळेल का, की निवडणुकीत महायुती तुटल्याने भाजपा व राष्ट्रवादी (अप) पक्ष स्थानिक पातळीवर जनतेला आकर्षित करेल, हे पाहणे रंजक ठरेल.
 
 
उमरखेडमध्ये अनेक प्रभागांमध्ये तिरंगी व बहुरंगी लढत आहे. ज्यामुळे निकाल अनपेक्षित ठरू शकतो. मतदानानंतरच्या या दीर्घ प्रतीक्षेमुळे काही उमेदवार देवदर्शनाला जात आहेत, मंदिरांमध्ये विशेष पूजा करत आहेत. तर काहींनी ज्योतिषांकडे कुंडल्या दाखवून विजयाचे योग जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी तर देवालाच ‘पाण्यात’ ठेवले आहे.
 
 
राजकारणात आत्मविश्वास असला तरी अंधश्रद्धा आणि धार्मिक भावना किती खोलवर रुजल्या आहेत, याची प्रचिती येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, उमरखेड नगर परिषदेत सत्ताधारी गटाला सलग दुसèयांदा संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या लाटेचा परिणाम येथेही दिसू शकतो.
 
 
जनमताचा कौल हा नेहमीच पैशापेक्षा चारित्र्य आणि कामगिरीकडे झुकतो असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात पैशाची ताकद आणि जातीय समीकरणे महत्त्वाची ठरतात. 2025 चा शेवट कोणासाठी गोड व कडू ठरेल, हे 21 डिसेंबरलाच समजेल. आता फक्त तीन दिवसांची प्रतीक्षा आहे. हा निकाल केवळ नगर परिषदेचा नाही, तर शहराच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0