सातारा ड्रग्स प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांत खळबळ

19 Dec 2025 11:19:25
सातारा,
Satara drugs case, सातारा ड्रग्स प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्स प्रकरणातील आरोपींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण मागवण्यात आल्याचा आरोप करत अंधारे यांनी शिंदे यांचा राजीनामा मागितला आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे.
 

Satara drugs case, Maharashtra politics 
सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत गुगल मॅप आणि व्हॉट्सअ‍ॅप लिंकचा लाईव्ह डेमो दाखवत साताऱ्यातील ‘हॉटेल तेजयश’चा मुद्दा उपस्थित केला. हे हॉटेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचे असल्याचा दावा त्यांनी केला. अंधारे यांनी सांगितले की, गुगल मॅपवर रिसॉर्टची माहिती दिसते आणि त्यावर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ऑनलाईन बुकिंगचा पर्याय उघडतो. त्या ठिकाणी ‘प्रकाश शिंदे’ असे नाव स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. ‘हॉटेल तेजयश’ हे नाव प्रकाश शिंदे यांच्या दोन्ही मुलांच्या नावावरून ठेवण्यात आल्याचे सांगत, आता यानंतरही प्रकाश शिंदे खोटे बोलणार का, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
या प्रकरणावर बोलताना सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल, तर अशा लोकांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, असे अंधारे म्हणाल्या.दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या राज्यात नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका सुरू असून या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. अंधारे यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देसाई यांनी दिला.
मात्र शंभुराज देसाई यांच्या या विधानानंतर सुषमा अंधारे यांनीही जोरदार पलटवार केला आहे. जिल्ह्याला कोकणचा विळखा पडलेला असताना पालकमंत्री नेमके काय करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी पुरावे दिले आहेत, मग मला धमक्या का दिल्या जात आहेत, असा प्रश्न करत विरोधकांचे काम म्हणजे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे असून ते आम्ही करत आहोत, हा आमचा अधिकार आहे, असे अंधारे यांनी ठणकावून सांगितले.या आरोप-प्रत्यारोपांमुळे सातारा ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून येत्या काळात या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आणखी तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0