रियाद,
24,000 Pakistanis deported from Saudi सौदी अरेबियाने रस्त्यांवर भीक मागत असल्याच्या आरोपाखाली तब्बल २४ हजार पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवले आहे. ही माहिती पाकिस्तानच्या संघीय तपास संस्थेचे (एफआयए) महासंचालक रिफत मुख्तार यांनी एका संसदीय समितीसमोर दिली. उमराह आणि पर्यटक व्हिसाचा गैरवापर करून मक्का व मदिना या पवित्र शहरांमध्ये भीक मागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिक सामील असल्याचे तपासात समोर आले आहे. एफआयएच्या माहितीनुसार, केवळ या वर्षातच सौदी अरेबियाने २४ हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले असून प्रत्यक्ष आकडा याहून अधिक असण्याची शक्यता आहे. परदेशात संघटित पद्धतीने भीक मागणे आणि त्यामागील गुन्हेगारी जाळे ही बाब आखाती देशांसाठी चिंतेची ठरत आहे. याच कारणामुळे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांनी पाकिस्तानी नागरिकांवर कडक पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मते, या प्रकारांमुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला गंभीर धक्का बसत आहे.

सौदी अरेबियाबरोबरच यूएईनेही पाकिस्तानी नागरिकांबाबत कठोर भूमिका घेतली असून, अनेकांवर व्हिसा निर्बंध लादण्यात आले आहेत. काही पाकिस्तानी नागरिक देशात प्रवेश केल्यानंतर गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी होत असल्याच्या संशयामुळे हे निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एफआयएच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये भिकारी टोळ्या उद्ध्वस्त करण्यासाठी आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी पाकिस्तानमधील विमानतळांवरून तब्बल ६६ हजारांहून अधिक प्रवाशांना परत पाठवण्यात आले आहे. रिफत मुख्तार यांनी संसदीय समितीला सांगितले की हे संघटित नेटवर्क केवळ पाकिस्तानची बदनामी करत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी अडचणी निर्माण करत आहेत.
ही समस्या केवळ आखाती देशांपुरती मर्यादित नसून आफ्रिका, युरोप तसेच कंबोडिया आणि थायलंडसारख्या देशांमध्येही पर्यटक व्हिसाचा गैरवापर करून पाकिस्तानी नागरिक भीक मागताना किंवा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आकडेवारीनुसार, याच वर्षात दुबई प्रशासनाने जवळपास ६ हजार पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले असून अझरबैजानमधून सुमारे २ हजार ५०० पाकिस्तानी भिकाऱ्यांना परत पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासूनच सौदी अरेबिया या समस्येकडे गांभीर्याने पाहत आहे. २०२४ मध्ये रियाध प्रशासनाने पाकिस्तान सरकारला अधिकृतपणे पत्र पाठवून मक्का आणि मदिना येथे भिक्षा मागण्यासाठी जाणाऱ्या लोकांना रोखण्याची मागणी केली होती. त्या वेळी सौदी अरेबियाच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने इशारा दिला होता की या प्रकारांवर नियंत्रण आणण्यात अपयश आल्यास पाकिस्तानी उमराह आणि हज यात्रेकरूंवर कठोर निर्बंध येऊ शकतात.