अफगाणिस्तानला पुन्हा ४.१ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का

19 Dec 2025 09:43:19
काबुल,
afghanistan earthquake भारताचा शेजारील देश अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार शुक्रवारी अफगाणिस्तानात ४.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. हा भूकंप जमिनीखालून अवघ्या १० किलोमीटर खोलीवर झाल्याने परिसरात जोरदार कंपने जाणवली आणि भूकंपानंतरचे धक्के बसण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

afghanistan earthquake
 
अफगाणिस्तानमध्ये भूकंप वारंवार होत असून, विशेषतः हिंदूकुश हा प्रदेश अत्यंत संवेदनशील भूकंपीय पट्ट्यात येतो. गेल्या काही आठवड्यांपासून या भागात सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ४ नोव्हेंबर रोजी उत्तर अफगाणिस्तानात झालेल्या ६.३ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर ही मालिका अधिक तीव्र झाली आहे. त्या भीषण भूकंपात किमान २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो नागरिक जखमी झाले होते, अशी माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली होती. या धक्क्यांमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून देशातील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक मशीदही नुकसानग्रस्त झाली होती. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार तो भूकंपही कमी खोलीवर झाल्याने त्याचा परिणाम अधिक तीव्र स्वरूपाचा ठरला होता. सध्या पुन्हा आलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Powered By Sangraha 9.0